एक दिवसाच्या बाळाला ओढ्यात टाकले पण दैव बलवत्तर म्हणून जीवदान मिळाले

अनैतिक संबंधातून जन्म घेतलेल्या एक दिवसाच्या बाळाला ओढ्यात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण, नागरिक आणि पोलीस यांच्या तत्परतेने बाळाला जीवदान मिळाले.

    पुणे : अनैतिक संबंधातून जन्म घेतलेल्या एक दिवसाच्या बाळाला ओढ्यात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण, नागरिक आणि पोलीस यांच्या तत्परतेने बाळाला जीवदान मिळाले. महिला पोलिसांनी मायेची उभं देताच त्यानं रडणं बंद केलं अन् हे चित्र पाहून येथे जमलेल्यांची मन हेलावून गेले होते. तर महिलांना अश्रू अनावर झाले. पोलिसांनी त्या निर्दयी आईवर गुन्हा दाखल केला आहे.

    याप्रकरणी 40 वर्षीय महिलेवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आंबील ओढा परिसर तसा गर्दीचा व पुण्यात वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध देखील. पण, एका घटनेने ओढाही नक्कीच शांतमय झाला असेल. कारण, मध्यरात्री आंबील ओढ्यात चिखलात एक नवजात बाळ रडत होते. येथील नागरिकांना हा प्रकार दिसताच त्यांनी तात्काळ माहिती दत्तवाडी पोलिसांना दिली. त्यानुसार दत्तवाडी पोलीस येथे दाखल झाले. त्यांनी बाळाला या चिखलातून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. तर, त्याला ससून रुग्णालयात दाखल केले.

    दरम्यान, पोलिसांनी बाळ टाकून देणाऱ्याचा शोध सुरू केला. दत्तवाडी पोलिसांचे पथक दांडेकर पूल व आंबील ओढा परिसर पिंजून काढला व नागरिकांकडे विचारपूस केली. त्यावेळी एका महिलेने अनैतिक संबंधातून बाळाला जन्म दिला होता. तिने हे बाळ बदनामी टाळण्यासाठी टाकून दिले असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिला अटक केली नसल्याचे सांगितले आहे.

    ही कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक विजय खोमणे, स्वप्नील लोहार, कस्पटे, कुंदन शिंदे, हेमंत धायगुडे, नीलम गायकवाड, सय्यद यांनी केली आहे.