A peacock caught in a hunters trap was spared
शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या मोराला मिळाले जीवदान

  • शिका-यांवर कडक कारवाईची मागणी

ओतूर : राष्ट्रीय पक्षी मोर हा आपल्या सौंदर्याने सर्वांनाच आकर्षित करणारा व भुरळ पाडणारा आहे मात्र ही भुरळ फक्त सौंदर्याचा आनंद घेण्यापुरतीच असायला हवी पण असे काही महाभाग आहेत ज्यांच्या लालची पणामुळे या राष्ट्रीय पक्षांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. वास्तविक वन्यप्राणी पाळणे,त्यांची शिकार करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे मात्र अजूनही या वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याने त्यांची संख्या घटत आहे ही चिंतेची बाब असून वनविभागाकडून याविषयी गांभीर्याने पावले उचलायला हवीत.

असाच एक गैरप्रकार

ओतूर वनपरिक्षेत्र वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी पाचघर येथील पावडे पाईन जमिनीलगत वनविभागात अज्ञात शिका-यांनी लावलेल्या पातळ तारेच्या जाळ्यात अडकलेल्या व तडफडणाऱ्या देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरास पाचघर(ता.जुन्नर)येथील जागरूक नागरिक व पोलीस पाटील विजय पावडे आणि अहिनवेवाडीचे माजी उपसरपंच जयराम जाधव या दोघांनी मिळून अडकलेल्या मोराला फासातून सहीसलामत बाजूला करुन जीवदान दिले.

अत्यंत घाबरलेल्या मोराला मायेने कुरवाळत पाणी पाजण्यात आले व त्यानंतर मोराला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. या दोघांचेही वनविभागाकडून व वन्यजीव प्रेमींकडुन आभार व कौतुक केले जात आहे.

चिल्हेवाडी,पाचघर हा डोंगर द-यातील निसर्गरम्य परिसर असून येथे दाट झाडीचा मोठा परिसर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची भटकंती असते. प्रामुख्याने बिबट्याची संख्या या परिसरात तुलनेने जास्त असून वानर,ससे,मोर व विविध प्रकारचे अनेक वन्य प्राण्यांचे ते जणु आश्रयस्थानच आहे.याचाच गैरफायदा घेत रात्रीच्या सुमारास वनविभागात चोरून शिकार करण्यासाठी फासे(जाळे)लावण्यात येते व त्या जाळ्यात अडकणाऱ्या वन्यजीवाचा बळी जातो असे येथील स्थानिक नागरिक सांगतात. यावर गांभीर्याने पावले उचलून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.