चार्जिंगसाठी ठेवलेल्या मोबाईलवरून ‘तो’ महिलांना पाठवायचा अश्लील व्हिडिओ; पोलिसांना समजले अन् पडल्या बेड्या

    पिंपरी : दुकानात चार्जिंगसाठी ठेवलेल्या मजूरांच्या मोबाईल नंबरवरुन महिलांना अश्लील व्हिडिओ दाखवून तसेच अश्लील मेसेज करणार्‍याला वाकड पोलिसांनी अटक केली. संपत राम (रा. चहाचे दुकान, रामदेव सुपर मार्केटजवळ, बाणेर, मूळ गाव जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    वाकड येथील एका महिलेला दोन वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप नंबरवरुन अश्लील मेसेजेस व अश्लील व्हिडिओ कॉलिंग करुन विनयभंग करण्यात आला होता. वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी तपास पथकाला आरोपीच्या शोधाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सुनिल टोणपे, सहाय्यक निरीक्षक एस. एम. पाटील यांनी ज्या मोबाईलवरुन हे मेसेजेस आले होते. त्याची माहिती घेतली. त्यात हे फोन बाणेर येथून आल्याचे निष्पन्न झाले.

    दरम्यान, या मोबाईलधारकांकडे चौकशी केल्यावर त्यांच्या मोबाईलचा वापर दुसरे कोणीतरी करत असल्याचे समोर आले. त्या व्यक्तीने इतरही काही महिलांना अशाप्रकारे अश्लील मेसेजेस व अश्लील व्हिडिओ कॉल करुन त्रास दिला असण्याची शक्यता आहे. ज्यांना अशाप्रकारे त्रास झाला आहे, अशा महिलांनी वाकड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.