क्रूर भाचा ! मामाचे तीन दात पाडले अन् डोळ्याचा चावा घेत पापण्याच काढल्या बाहेर…

    पुणे : धिंगाणा घालणाऱ्या भाच्याला समजावण्यास गेलेल्या मामाचे भाच्याने दगड मारून तीन दात पाडले अन् डोळ्याचा चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना पुण्यातील बिबवेवाडीत घडली आहे. महादेव बाबू शिंदे (वय ३७, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी उमेश रमेश वाघमारे (वय ३२) याला पोलीसांनी अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे मामा-भाचे आहेत. दरम्यान, भाचा उमेश वाघमारेला दारूचे व्यसन आहे. तो गल्लीत गोंधळ घालत होता. त्यामुळे नागरिक जमा झाले होते. यावेळी मामा महादेव यांनी त्याला मी समजावून सांगतो, असे म्हणाला व त्याला समजावण्यास गेले. यावेळी भाचा उमेश याने मामाशीच वाद घातला. यातून दोघांत भांडण झाले.

    उमेशने पडलेला दगड उचलला आणि मामाच्या तोंडावर मारत त्यांचे तीन दात पाडले. तर, त्यांच्या उजव्या डोळ्याचा चावा घेत त्यांच्या पापण्याच बाहेर काढल्या. यात त्यांना पाच टाके पडले आहेत. ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी पोलीसांकडे तक्रार केली. पोलीसांनी उमेशला अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक देशमुख हे करत आहेत.