गावठी पिस्टल बाळगणारा गजाआड,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

    मावळ/कामशेत : सतिश गाडे : मावळ तालुक्यातील कामशेत परिसरात २१ वर्षीय तरुणाकडून २ गावठी पिस्टल व २ काडतुसे
    एक मोबाईल असा एकूण एक लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवार (दि. १२) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.

    प्रतीक अर्जुन निळकंठ (वय २१, रा. कामशेत, ता.मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून एक लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आरोपीला कामशेत पोलिसांच्या ताब्यात दिले. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत परिसरात एका तरुणाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने कामशेत गावच्या हद्दीतील मुंबई-पुणे महामार्गाच्या कामशेत खिंडीतील मोकळ्या जागेत सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी प्रतिक याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला २ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे व १ मोबाइल असा मुद्देमाल मिळून आला आहे.

    या आरोपीवर यापूर्वी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार शब्बीर पठाण, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, सुनिल जावळे, सचिन गायकवाड, मुकुंद आयचीत, पोलीस नाईक गुरु जाधव व प्राण येवले यांच्या पथकाने केली.