अन् त्यांच्या चेहऱ्यावर फुटले हसू!

-रेल्वेगाडी सुटण्यापूर्वीच ऐवज मिळाला पुणे : उत्तरप्रदेशातील मजूर दाम्पत्याकडील सोन्याचे दागिने ठेवलेली पिशवी गहाळ होताच पोलिसांनी क्षणाचा वेळ न लावता तिचा शोध घेण्याची कौतुकास्पद घटना पुणे

रेल्वेगाडी सुटण्यापूर्वीच ऐवज मिळाला

पुणे :  उत्तरप्रदेशातील मजूर दाम्पत्याकडील सोन्याचे दागिने ठेवलेली पिशवी गहाळ होताच पोलिसांनी क्षणाचा वेळ न लावता तिचा शोध घेण्याची कौतुकास्पद घटना पुणे स्टेशनमध्ये घडली. हडपसर-पुणे  बस प्रवासात ही पिशवी गहाळ झाली होती.  gfपोलिसांमधील माणुसकी पाहून या दाम्पत्याला गहिवरून आले.

गेले दोन महिने लॉकडाऊनमध्ये अडकून पडल्यावर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गावी जाण्यासाठी सोय करुन दिली. तेव्हा सर्व सामान घेऊन ते कुटुंब बसने पुणे स्टेशनला पोहचले. रेल्वे स्टेशनला पोहचल्यावर त्या कुटुंबाच्या लक्षात आले. त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली. बसमध्ये विसरलेल्या बॅगा शोधायच्या तर गाडी सुटून जाण्याची भीती आणि बॅग सोडायची म्हटले तर आयुष्यभरात जमवलेले दागिने, रोख रक्कम गमाविण्याची भीती अशी अवस्था झाल्याने ते कुटुंब धाय मोकलून रडू लागले. ही बाब तेथे बंदोबस्तावर असलेल्या परकीय नागरिक नोंदणी विभागातील पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी चौकशी करुन थेट हडपसरपर्यंत जाऊन त्यांच्या मौल्यवान बॅगा परत घेऊन आले व गाडी सुटण्यापूर्वी त्यांच्या ताब्यात दिल्या. पोलीस बॅगा घेऊन येत असल्याचे पाहून या कुटुंबाचे रडवेल्या चेहर्‍यावर हास्य फुलले आणि डोळ्यातून आनंदाश्रु ओघळू लागले. ते अश्रु पाहून पोलिसांनाही झालेल्या धावपळीचे समाधान लाभले. उत्तर प्रदेशातील बस्तीला जाणाऱ्या  रेल्वेगाडीच्या वेळी पुणे रेल्वे स्टेशनवर मंगळवारी रात्री ही घटना घडली.परप्रांतियांना रेल्वेगाडीने त्यांच्या उत्तर प्रदेशातील गावी पाठविण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवरुन मंगळवारी रात्री विशेष श्रमिक रेल्वेगाडी सोडण्यात आली. त्यासाठी हडपसर येथून पीएमपी बसने मजूरांना कुटुंबासह रेल्वे स्टेशनला आणण्यात आले होते.समन्वय अधिकारी पोलीस उपायुक्त सारंग आवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, निरीक्षकराजकुमार शेरे व त्यांच्या सहकारी त्यावर लक्ष ठेवून होते.  रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक एन्ट्री गेटजवळ एका कुटुंबाचा रडण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा पोलीस नाईक किरण बरडे, मच्छिद्र धापसे यांनी चौकशी केली. अशोक कुमार, त्यांची पत्नी पूनम देवी व त्यांच्या सोबत २ वर्षांची शिवन्या व २ महिन्यांची अनन्या या कुटुंबाची दागिने व रोकड असलेल्या बॅगा बसमध्ये विसरल्याचे त्यांनी सांगितले. किरण बरडे यांनी बाहेर येऊन चौकशी केल्यावर बस निघून गेली होती. ते दुचाकीवरुन निघाले़वाटेत बस त्यांना आढळली नाही. ते थेट हडपसर डेपोमध्ये गेले. तेव्हा बस सॅनिटाईज करण्यासाठी गेली होती. ते तेथे गेले व बसचालकाला हा प्रकारसांगितला. बसमध्ये त्यांच्या दोन बॅगा आढळून आल्या. त्यांनी मोबाईलवरुन बॅगा मिळाल्याचे सांगितले व पुन्हा हडपसर डेपोतून ते दुचाकीवरुन पुणे रेल्वे स्टेशनवर पोहचले. रेल्वेगाडी सुटण्यापूर्वी त्यांनी अशोककुमार यांच्या किंमती बॅगा त्यांच्या हवाली केल्या. बॅगा मिळताच त्यांना आपला आनंद लपविता आला नाही.