आश्चर्यच.. ‘तहसील’मधून वाळूसह ट्रक चोरणाऱ्या चोरट्याने परत आणून ठेवला ट्रक

थेट प्रशासकीय भवनाच्या परिसरातून सहा ब्रास वाळूसह बारा लाख रुपयांचा ट्रक पळवून नेणा-या आरोपीने आज (दि.२३) सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास वाळूसह तो ट्रक परत इंदापूर पोलीस ठाण्यात आणून लावला.त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  इंदापूर :सलग दोन दिवसांच्या शासकीय सुट्टीचा गैरफायदा घेवून,शनिवारी (दि.२०)थेट प्रशासकीय भवनाच्या परिसरातून सहा ब्रास वाळूसह बारा लाख रुपयांचा ट्रक पळवून नेणा-या आरोपीने आज (दि.२३) सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास वाळूसह तो ट्रक परत इंदापूर पोलीस ठाण्यात आणून लावला.त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  किरण रवींद्र दिवेकर (वय २३ वर्षे रा.वरवंड, ता. दौंड जि.पुणे) असे आरोपीचे नाव आहे.या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की,तहसीलदारांच्या आदेशानुसार इंदापूरचे मंडलाधिकारी सोपान हगारे, तलाठी आण्णाराव मुळे, वाहनचालक नितीन काळे यांनी दि.९ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कालठण नं.२ गावच्या हद्दीत रेडकेवस्ती जवळ बेकायदा वाळू वाहतुक केल्याच्या कारणावरुन सोमनाथ तनपूरे (रा.व्याहळी,ता. इंदापूर) याच्या मालकीचा उपरोक्त बारा लाख रुपये किंमतीचा ट्रक (क्र.एम.एच.१२ एम व्ही ५७५१) त्यामधील ३६ हजार २८८ रुपये किंमतीच्या सहा ब्रास वाळूसह ताब्यात घेतला.कारवाई साठी प्रशासकीय भवनाच्या आवारात लावला होता.शनिवारी (दि.२०)रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तो ट्रक तेथून पळवून नेण्यात आला.
  नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आदेश मंडलाधिकारी हगारे यांना दिले.त्या नुसार हगारे यांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
  प्रशासकीय भवनास शासकीय पहारेकरी नेमण्यात आलेला नाही.खाजगी पहारेक-याची नेमणूक करण्यात आली आहे.तो शनिवारी हजर होता.रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दहा मिनिटांच्या अवधीसाठी तो कार्यालयाच्या इमारतीमध्ये गेला, त्याच वेळी वरील प्रकार घडला असावा,असा अंदाज नायब तहसिलदार ठोंबरे यांनी व्यक्त केला होता.

  दरम्यान,आज सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान आरोपी स्वतः तो ट्रक घेवून इंदापूर पोलीस ठाण्यात हजर झाला.त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन तांबे अधिक तपास करत आहेत.
  पत्रकारांशी बोलताना पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे म्हणाले की,ट्रकचा मालक सोमनाथ तनपुरे (रा. तनपुरेवाडी ता.इंदापूर) याची पूर्वीची पार्श्वभूमी कशी आहे.घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास महसूल विभागाकडून विलंब का झाला,याचा तपास पोलिस यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

  या संदर्भात नायब तहसिलदार अनिल ठोंबरे म्हणाले की,दोन सलग शासकीय सुट्ट्या असल्याचा गैरफायदा घेत हा प्रकार संबंधितांनी केला आहे.तो आपल्या निदर्शनास आल्यानंतर, आपण महसूल विभागातील अधिका-यांना,ट्रकचा नंबर नमूद करुन ट्रकमालकाविरुध्द फिर्याद देण्याचा आदेश दिला होता.या प्रकरणी आरटीओच्या विभागीय कार्यालयाशी आपण पत्रव्यवहार करणार आहोत.भविष्यकाळात असे प्रकार घडू नयेत यासाठी वरिष्ठांशी बोलून कायमस्वरुपी पहारेक-याची नेमणूक करण्यात येणार आहे.