चोरट्यांची कमाल; स्कॉर्पिओ घेऊन आले अन् म्हशींचे पिल्ले चोरून नेले…

विमानतळ परिसरातून चोरट्यांनी स्कॉर्पिओमधून चक्क चार म्हशींची पिले चोरून नेली आहेत. हा प्रकार समोर आल्याने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. 

    पुणे : पुण्यात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी कमालच केली असून, आता या चोरट्यांनी पोलीसांना रडावं की हसावं अशा अवस्थेत आणून ठेवले आहे. विमानतळ परिसरातून चोरट्यांनी स्कॉर्पिओमधून चक्क चार म्हशींची पिले चोरून नेली आहेत. हा प्रकार समोर आल्याने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

    याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयुर बिडकर यांनी तक्रार दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोहगाव परिसरात राहतात. फाईव्हनाईन चौकात त्यांचा म्हशींचा मोठा गोठा आहे. दरम्यान, त्यांच्याकडे म्हशींसोबतच कोंबड्या तसेच गाई देखील आहेत. त्यांच्या म्हशींनी पिल्लांना नुकताच जन्म दिला होता.
    यादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी या गोठ्यातून चार म्हशींची पिल्ले चोरली. ती स्कॉर्पिओत घातली. त्यानंतर ते पसार झाले. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली.

    विमानतळ पोलीसांनी देखील या पिल्लांचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलीसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू केला. स्कॉर्पिओ सापडली. पण, ती चोरीची असल्याचे दिसून आली आहे.