देहू-आळंदी रस्त्यावर महापालिकेच्या प्रवेशद्वारात स्वागत कमान उभारणार

या मार्गावर महापालिकेमार्फत कोठेही स्वागत कमान अथवा प्रवेशद्वार उभारण्यात आलेले नाही. या रस्त्यावर महापालिका हद्दीत देहूकडून येताना तळवडे परिसराच्या सुरूवातीस स्वागत कमान उभारण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

    पिंपरी: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आळंदी आणि देहू रस्त्यावर पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. या कामाअंतर्गत देहू येथे महापालिका हद्दीवर कमान उभारण्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना निविदा स्विकृत रकमेच्या १.९५ टक्के शुल्क देण्यात येणार आहे.

    पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीलगत पूर्वेस आळंदी आणि पश्चिमेस देहूगाव अशी दोन तिर्थक्षेत्रे आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी, भाविक आळंदी आणि देहू येथे येत असतात. सद्यस्थितीत देहू-आळंदी हा मार्ग बीआरटीएस विभागामार्पâत विकसित करण्यात आला आहे. याच ३० मीटर रूंदीच्या मार्गावरून भाविक आळंदी ते देहू असा पायी प्रवास करतात. महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही या तिर्थक्षेत्रास भेट देण्यासाठी भाविक येत असतात. त्यांचा या मार्गावरील बहुतेक सर्वच प्रवास पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतून होत असतो. तथापि, या मार्गावर महापालिकेमार्फत कोठेही स्वागत कमान अथवा प्रवेशद्वार उभारण्यात आलेले नाही. या रस्त्यावर महापालिका हद्दीत देहूकडून येताना तळवडे परिसराच्या सुरूवातीस स्वागत कमान उभारण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

    महापालिकेच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात विशेष योजना या लेखाशिर्षाअंतर्गत सहा कोटी इतकी प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. तसेच या कामासाठी ७६ लाख ३५ हजार रूपये इतकी तरतुद करण्यात आली आहे. देहू-आळंदी रस्त्यावर देहू येथे महापालिका हद्दीवर कमान उभारण्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी दर मागविण्यात आले होते. त्यानुसार, किमया यांचा १.९५ टक्के इतका लघुत्तम दर प्राप्त झाला आहे. या कामाचे नियोजन करून आराखडे तयार करणे, सुशोभिकरणाच्या बाबींचे दरपृथ्थकरण करणे, त्यानुसार, पुर्वणक पत्रक करणे, निविदा बनविणे आदी निविदापूर्व आणि निविदापश्चात कामे करावी लागणार आहेत. राज्याच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्क आणि त्यांच्या प्रदानाबाबत मार्गदर्शक सुचनांनुसार सहा टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. या टप्प्यांनुसार वास्तुविशारद किमया यांना निविदा स्विकृत रकमेच्या १.९५ टक्के शुल्क देण्यात येणार आहे.