भीमाशंकर जवळील धबधब्यात पडून तरूणाचा मृत्यू

    मंचर : भीमाशंकर जवळील कोंढवळ येथील धबधब्यात पडून एकाचा गुरुवारी (दि. १७) दुपारी मृत्यू झाला. सध्या कोरोना काळात पर्यटनास बंदी घालण्यात आली असून काही हौशी पर्यटक भीमाशंकर परिसरात बिनधास्त वावरत असतात. येथील पोलिसांंच्या दुर्लक्षपणामुळे हि घटना घडल्याची परिसरात चर्चा सुरू आहे.

    श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर हा घनदाट अभयारण्यात असून ठिकठिकाणी धबधबे आहेत. यात कोंढवळ धबधबा हा नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. सध्या देशात कोरोना काळात पर्यटनास बंदी घालण्यात आली असून काही हौशी पर्यटक भीमाशंकर परिसरात बिनधास्त वावरत असतात. घोडेगाव पोलिस ठाण्या अंर्तगत हा परिसर येत आहे. भीमाशंकर परिसरात फिरत चार जण कोंढवळ येथील धबधब्या जवळ गेले होते. एकाचा पाय घसरला व धबधब्याच्या चोहडीत गेला. लक्ष्मण सोन्याबापू लाहारे (वय २९, रा. शिक्रापूर, ता. शिरुर,  मुळ रा. राहाता, नगर) याचा धबधब्यात पडून मृत्यू झाला आहे. घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे, पोलिस जवान दिपक काशिद, जयराम वाजे यांनी घटनास्थळी येऊन पडलेल्या तरुणाला काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. सध्या स्थानिक लोकांच्या, पोलिस पाटील, सरपंच यांच्या मदतीने शोध सुरु आहे. तहसिलदारांच्या मदतीने एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे.

    मुक्त संचार करण्यास बंदी

    कोंढवळ धबधबा परिसर हा सुरक्षित असणे गरजेचे आहे. येथे पर्यटकांना मुक्त संचार करण्यास बंदी घालण्यात आली असताना अनेक घटना येथे घडूनही वन्यजीव विभाग व पोलिस यंत्रणा गाफील राहात असल्याने अनेकांचा बळी येथे जात आहे.