A young woman stuck in a window grill; Strange incident at the Quarantine Center in Pune

पुण्यातील एरंडवणे भागातील एका क्वारंटाइन सेंटरमधून रात्री साडे अकराच्या सुमारास एका युवतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या मजल्यावरून खाली उतरण्याचा तिचा विचार होता. त्यानुसार तिने खिडकीचा वापर करण्याचे ठरवले. मात्र, असे करताना ही मुलगी खिडकीच्या गजांमध्ये अडकून बसली.

    पुणे : देशभरात कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. खबरदारी म्हणून शासन-प्रशासनाकडून नियम पाळण्याची सक्ती केली जात असताना, नागरिक मात्र त्यांना काही जुमानताना दिसत नाहीत. पुण्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी महापालिकेने जोरदार तयारी केली असून अनेक ठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारले आहेत. परंतू काही पॉझिटिव्ह रुग्ण क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. सोमवारी रात्री असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न एका तरुणीला चांगलाच महागात पडला आहे. सेंटरमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात ती खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकली.

    पुण्यातील एरंडवणे भागातील एका क्वारंटाइन सेंटरमधून रात्री साडे अकराच्या सुमारास एका युवतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या मजल्यावरून खाली उतरण्याचा तिचा विचार होता. त्यानुसार तिने खिडकीचा वापर करण्याचे ठरवले. मात्र, असे करताना ही मुलगी खिडकीच्या गजांमध्ये अडकून बसली.

    कोणालाही प्रयत्न करूनही तिला बाहेर काढता येईना. अखेर अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. त्यांनी त्या मुलीला धीर देत खिडकीचे गज कापून तिची सुटका केली. यावेळी हायड्रॉलिक कटरचा वापर करावा लागला. दरम्यान, कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून प्रशासनाने क्वारंटाइन सेंटर तयार केली आहेत.

    मात्र, तिथूनही नागरिक पळून जात असल्याने प्रशासनासमोर नव्या समस्या उभ्या राहताना दिसत आहेत. ही युवती दुसऱ्या मजल्यावरून खाली जाताना जखमी झाली असती किंवा जीवावर बेतले असते तर गंभीर प्रसंग ओढवण्याची शक्यता होती.