पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाने पोलिस चौकीतच घातला राडा, चौकीचेही केले नुकसान

एका तरुणाने पोलिस चौकीतच राडा घातला. चौकीचे नुकसान करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

    पिंपरी : पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण करण्याचे सत्र पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारीही सुरुच राहिले. गेल्या चार दिवसांत चौथ्यांदा अशी घटना घडली आहे. ताज्या घटनेत एका तरुणाने पोलिस चौकीतच राडा घातला. चौकीचे नुकसान करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेथील फौजदाराला बाहेर आल्यावर सोडणार नाही, अशी धमकी देण्यापर्यंत त्याने मजल गाठली. यानिमित्ताने गुन्हेगारांचे धाडस शहरात भलतेच वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक कमी झाला की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

    निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यमुनानगर चौकीत गोंधळ घालणाऱ्या सूरज असकर चौधरी (रा. ओटास्कीम, निगडी) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने काल भरदिवसा या चौकीबाहेर पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लागलीच त्याच्या पत्नीची त्याच्या तावडीतून सुटका करीत त्याला चौकीत आणले. त्यावेळी त्याने तेथील पीएसआय उत्तम ओंबासे व पोलिस नाईक मुळे यांना धक्काबुक्की केली. तसेच चौकीतील टेबलावर बसून चौकीची काच फोडली. नंतर ती स्वत:च्या गळ्यावर मारून घेतली.

    याबाबत माहिती देताना पीएसआय ओंबासे म्हणाले, ”चौधरी हा पत्नीला तिचा पहिला पती विशाल पंडितविरुद्ध छळ केल्याची तक्रार दे, असे सांगत होता. मात्र, त्याच्यापासून तिला तीन मुले असल्याने त्यांचे भवितव्य विचारात घेऊन तिने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या चौधरीने चौकीच्या आवारातच तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तिचा आरडाओरडा ऐकून चौकीतील पोलिस वेळेत तिच्या मदतीसाठी धावून आल्याने तिचा जीव वाचला.” चौधरीविरुद्ध बलात्कारासह आणखी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    पोलिसांवरील हल्ल्याचे सत्र सुरुच

    गेल्या पाच दिवसांपासून पिंपरी पोलिस आयुक्तालयात पोलिस कर्मचारीच नाही. तर पोलिस अधिकाऱ्यांवरही हल्ले होण्याचे सत्र सुरु झाले आहे. ते थांबण्याचे नावच घेत नाहीत. दिघी, चाकण, वाकड, पिंपरीनंतर काल निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हणजे शहराच्या सर्वच भागांत पोलिसांना मारहाणीच्या तथा सरकारी कामात अडथळा आणल्याच्या घटना घडल्या आहेत.

    कालच्या घटनेअगोदर पिंपरीच्या लालटोपीनगरमध्ये पिंपरी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई पंडीत लक्ष्मणराव धुळगुंडे (वय ३१) यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात दोघा सराईत गुन्हेगारांनी अडथळा आणला होता. आमच्यावर अनेक गुन्हे असल्याचे सांगत आणखी एका केसने काय फरक पडणार आहे, असे उद्दाम वक्तव्यही आरोपींनी त्यावेळी केले होते. त्यात एक ज्येष्ठ नागरिक आहे. तर, २९ तारखेला रहाटणीफाटा येथे पाटील नावाच्या वाहतूक पोलिसाला राजू भाटी या विनामास्क मोटारचालकाने धक्काबुक्की केली. वर काय करायचे ते कर, असे म्हणत त्याने पोलिसाला शिवीगाळही केली. तर, त्याअगोदर २५ जुलैला शेल पिंपळगाव (ता.खेड,जि.पुणे) येथे अमर शंकर मोहिते (वय २९, रा. मोहितेवाडी, शेल पिंपळगाव, ता.खेड) व गणेश प्रकाश गुंडाळ (वय २८, रा. भोसे, चाकण, ता.खेड) या तरुणांनी चाकण पोलिस ठाण्याचे फौजदार सुरेश झेंडे यांची मानगूट पकडून त्यांना मारहाण केली होती.