भोसरीत आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या कामाला गती ; शहरातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प

आमदार महेश लांडगे यांच्या व्हीजन-२०२० मधील आणखी एक प्रकल्प दृष्टीक्षेपात

पिंपरी : भोसरी मतदार संघातील मोशी येथे नियोजित असलेल्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या कामाला गती मिळाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. अखेर आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा करून प्रदर्शन केंद्राचे काम प्रगतीपथावर सुरू केले आहे.

मोशीतील आंतरराष्ट्रीय खुल्या प्रदर्शन केंद्रच्या कमर्शियल प्लॉटच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची निविदा काढण्यात आली आहे. तब्बल ३५ हजार स्क्वेअर मीटर हॉल पैकी २० हजार स्क्वेअर मीटर हॉलच्या कन्सल्टन्सीबाबत निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शासनाकडून मान्यता घेऊन एक एक काम पूर्ण केले जात आहे, अशी माहिती पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर यांनी दिली.

प्राधिकरण प्रशासनाने कमर्शियल प्लॉटच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे एकूण १२२ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. निविदा प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवस निविदा भरायची अंतिम तारीख आहे. निविदा प्रक्रियेनंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प!
आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र हा प्रकल्प सुमारे १५ वर्षे मुदतीचा आहे. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा खर्च यासाठी होणार आहे. प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात ३५ हजार स्क्वेअर मीटर हॉल पैकी २० हजार स्क्वेअर मिटर हॉलसाठी कन्सल्टन्सीचे टेंडर चालूच आहे. तब्बल २४० एकरमध्ये हे केंद्र होणार आहे. राज्य शासनाच्या ‘हाय कमिटी’ च्या मान्यतेने प्रकल्पाची कामे सुरू आहेत. संबंधित समितीच्या मान्यता घेऊन एक-एक टप्पा पूर्ण करण्यात येत आहे.

याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्राला गती देण्यासाठी आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे देश-विदेशातील औद्योगिक कंपन्यांची उत्पादने पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहेत. पिंपरी-चिंचवड, पुण्यासह महाराष्ट्रातील औद्योगिक कंपन्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे, स्थानिक भूमिपुत्रांना व्यावसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे प्रदर्शन केंद्राचे काम रखडले होते. मात्र, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून या प्रकल्पाला चालना देण्यासाठी आम्ही सकारात्मक पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत.