शिक्रापूर येथे रस्ता ओलांडताना अपघात; एकाचा मृत्यू

    शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे पुणे नगर महामार्गावर चोवीसवा मैल येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत अविनाश कैलास शेळके या ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, शिक्रापूर पोलिस ठाणे येथे अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शिक्रापूर ता. शिरुर येथील लकी हॉटेलसमोर १५ जून रोजी अविनाश शेळके ही व्यक्ती रस्ता ओलांडत असताना अहमदनगरच्या दिशेने पुण्याच्या बाजूने येणाऱ्या अज्ञात वाहनाची अविनाश याला जोरदार धडक बसली. दरम्यान, येथील नागरिकांनी जखमी अविनाश याला तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच अविनाशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमध्ये अविनाश कैलास शेळके (वय ३५ वर्षे रा. पिंपळे खालसा ता. शिरुर जि. पुणे) याचा मृत्यू झाला असून, याबाबत स्वप्नील नारायण शेळके (वय २७ वर्षे रा. पिंपळे खालसा ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली.

    शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराम खाडे हे करत आहे.