पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; ४ ठार

    इंदापूर : भरधाव वेगातील कारचे टायर फुटून विरुध्द बाजूच्या रस्त्यावर येत बोलेरो गाडीला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एक व बोलेरोमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
    ही घटना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल पायलजवळ आज (दि.७) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

    ज्योतिराम सूर्यभान पवार (वय ३६ वर्षे, रा.उलवे,रायगड), अविनाश कुंडलिक पवार (वय २८ वर्षे), गणेश पोपट गोडसे (वय ३८ वर्षे), बाळासाहेब चांगदेव साळुंखे (वय ४९ वर्षे, तिघे रा. गुरसाळे, ता. पंढरपूर, जि.सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. या संदर्भात माहिती अशी की, सोलापूर बाजूकडून भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने निघालेल्या इर्टीगा (एमएच ४६ बी इ ४५१५) कारचे टायर अचानक फुटल्याने ती डिव्हायडर तोडून विरुध्द बाजूच्या रस्त्यावर गेली.

    सोलापूरकडे जाणाऱ्या बोलेरो (एमएच १३ ए झेड ३९०१) या गाडीला तिची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धोत्रे, सहाय्यक फौजदार नितिन ठोंबरे, हवालदार मड्डी, जाधव हे तातडीने अपघातस्थळी पोहोचले. वाहनांमध्ये अडकलेले मृतदेह बाजूला काढले. हे मृतदेह पुढील तपासणीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले.