मध्यप्रदेशमधील साडेअठरा लाखांच्या फसवणूकप्रकरणी आरोपीस बारामतीतून अटक

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मध्य प्रदेशमधील १८ कोटी ५० लाख रूपयांच्या फसवणूक प्रकरणी काटेवाडी (ता.बारामती) येथील युवक योगेश अजित काटे यास अटक करण्यात आली आहे.

    याबाबतची माहिती अशी की, दिलीप बिल्डकॉन लिमिटेड भोपाळ या कंपनीचे पंजाब नॅशनल बँकेचे १८ कोटी ५० लाख रूपयांचे धनादेश क्लोनिंग करण्यात आले. त्यानंतर सदर धनादेश आडीबीआय बँकेच्या मॅनेजरच्या मदतीने ओडीसा येथील एका इसमाच्या करंट अकाउंटवर टाकून फसवणूक केल्याबाबत स्पेशल टास्क फोर्स भोपाळ (मध्यप्रदेश) येथे दाखल आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. या गुन्हयातील आरोपी आडीबीआय बॅंकेचे मॅनेजर सरोज महापात्रा यास यापूर्वी अटक केली आहे.

    गुन्हयातील आरोपी योगेश अजित काटे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी एसटीएफ भोपाळ येथील तपास पथकाने बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना मदत मागितली. त्यानंतर पोलीस निरीक्षक ढवाण यांनी तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्यासह पोलीस नाईक बंडगर, पोलीस हवालदार कांबळे, सपकळ, महिला पोलीस काळे यांना आरोपी काटे यास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पथकाने तांत्रिक तपास करीत आरोपी काटे यास मोरगाव रोड (ता. बारामती) येथून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी भोपाळच्या स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभाग बारामती, पोलीस निरीक्षक ढवाण यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पोरे, पोलीस नाईक बंडगर, पोलीस हवालदार कांबळे, सपकळ, महिला पोलीस काळे यांनी ही कारवाई केली.