Accused firing on police officer; Shocking incident in Phaltan taluka

बारामती : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर आरोपीने गोळीबार केल्याची घटना फलटण(जि सातारा)  जवळ असणा-या वढले गावच्या परीसरात घडली आहे.  या घटनेत पोलिस अधिकारी लांडे थोडक्यात बचावले आहेत.

लांडे हे दरोड्याच्या  गुन्ह्यातील आरोपीचा पाठलाग करत सातारा जिल्ह्यातील  वढले (ता फलटण) या ठिकाणी गेले होते.  यावेळी आप्पा  माने या व्यक्तीने गोळीबार केल्याची सुत्रांनी   माहिती दिली. या घटनेत सहाय्यक पोलिस निरीक्षक लांडे बचावले आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच फलटण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन महिन्यापूर्वी भोर तालुक्यातील राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या वेशात आलेल्या दरोडेखोरांनी  गोळीबार करत सराफी दुकान लुटले होते. या टोळीचा सुगावा लागल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच वडगाव निंबाळकर पोलिस वढले येथे आरोपींचा पाठलाग करत होते, यावेळी एकाला पोलिसांनी  जेरबंद केले.  तर, तिघेजण लांडे व इतर पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार करत ऊसाच्या शेतात पळून जाण्यात यशस्वी झाले. सुदैवाने पोलिस अधिकारी लांडे यांच्यासह पथकातील कोणालाही इजा झालेली नाही.