पाटस येथील दोन तरुणांची हत्या करणारे आरोपी अटकेत; चौघे १२ तासांच्या आत जेरबंद

  पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथे रविवारी रात्री दोन युवकांचा काठ्या, तलवारीने वार करून आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर अवघ्या बारा तासांच्या आतच पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना बारामती परिसरात अटक केली. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख हे स्वतः यवत पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून या सर्व घडोमोडींचा आढावा घेत कसून चौकशी करीत होते.

  शिवम संतोष शितकल (वय 23) गणेश रमेश माखर (वय २३ ) दोघेही रा. पाटस (अंबिकानगर ता.दौंड.जि.पुणे,) अशी खुन झालेल्या युवकांची नावे आहेत. पाटस येथील तामखडा येथील भानोबा मंदिरासमोर रविवारी (दि.4) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी यवत पोलीसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामधील तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली होती. तर उर्वरीत 4 ते 5 आरोपी फरार झाले असून, त्यांची नावे समजली नव्हती. पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे.

  या प्रकरणी महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय २२ रा.पाटस, तामखडा ता.दौंड जि.पुणे ) महेश मारुती टुले (वय २० रा.पाटस, तामखडा ता.दौंड जि.पुणे ) ,युवराज रामदास शिंदे (वय १९ रा.गिरीम, मदनेवस्ती ता.दौंड जि.पुणे), गहिनीनाथ बबन माने (वय १९ रा.गिरीम, राघोबानगर ता.दौंड जि.पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारामती परिसरात ड्रायव्हर ढाबा, बारामती एअरपोर्ट रोड येथून ताब्यात घेतले.

  आरोपींनी विनाकारण फोनवरून आई आणि बहिणीच्या नाव्याने शिवीगाळ केली. शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारायला गेलेल्या या दोन युवकांची काठ्या, तलवारीने वार करून आणि दगडाने ठेचून ही हत्या केली. घटनेचे माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे घटनास्थळी धाव घेतली.

  दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी ही लगेच घटनास्थळी भेट दिली. सोमवारी पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला तपासाच्या सुचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेने हा तपास जलद गतीने करून चार आरोपींना अटक केले.

  पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे,पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, दत्ता तांबे, सचिन गायकवाड, सुभाष राऊत,पोलीस नाईक गुरु गायकवाड,अभिजित एकाशिंगे, काशिनाथ राजापुरे,शब्बीर पठाण, विद्याधर निश्चित,प्रमोद नवले,गुरु जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.