२६ जुगाऱ्यांवर कारवाई; भिगवण पोलिसांची ‘सिंघम’ कारवाई

    भिगवण : भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबोडी रस्त्यावरील जुगार अड्यावर भिगवण पोलिसांनी छापा मारत एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यासोबतच राजकीय पदाधिकारी, नामवंत वस्ताद आणि ‘व्हाईट कॉलर’ नागरिक असल्याची माहिती मिळत आहे.

    याबाबत भिगवण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीत निंबोडी रस्तावर असणाऱ्या डोंगराजवळ हा अड्डा चालविला जात होता. याची माहिती पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांना गोपनीय बातमीद्वारे मिळाली होती. याच माहितीचा आशय घेत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी तातडीने या ठिकाणी छापा टाकत ही कारवाई केली. या कारवाईत ८ टेबलावर खेळविल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यावर १ लाख १२ हजार ७८० रोख रकमेसह एकूण ३ लाख १२ हजार ७८० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

    यावेळी अड्डाचालक हनुमंत माणिक थोरात यांच्यासह २६ जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते, पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने, पोलीस अनंता वारगड, संदीप लोंढे, केशव चौधर, नवनाथ भागवत, समीर करे यांच्या पथकाने केली.

    या कारवाईत अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. तर आपले नाव या कारवाईचे यादीतून काढण्यासाठी काहींनी अनेक प्रयत्न करूनही पोलिसांनी कारवाईत कोणालाही दाद दिली नसल्याची माहिती दिली जात आहे.

    अनेकदा बदलली जागा

    पोलीस कारवाई होण्याच्या भीतीने अनेकवेळा जागा बदल करून हा जुगार अड्डा चालविला जात होता. रिमझिम पाऊस चालू असताना पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने या ठिकाणी प्रवेश करीत अड्ड्यावर छापा टाकल्याने जुगाऱ्यांचे पळून जाण्याचे प्रयत्न हाणून पाडले.

    एकूण ८ टेबलवर २६ जुगारी

    एकूण आठ टेबलवर सुरु असणाऱ्या या जुगारीत बारामती, इंदापूर, दौंड, कर्जत, फलटण, माळशिरस अशा ६ तालुक्यातील २६ जुगारी खेळत होते. त्यामुळे जागतिक महामारीच्या काळात सर्व व्यवहार आणि आस्थापना बंद असताना असले उद्योग कसे चालू राहतात, असा प्रश्न पडतो.