सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर कारवाई  ; आतापर्यंत तब्बल २९ कोटींचा दंड वसूल

दुसर्‍या लाटेमुळे शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील अनेक नागरिक घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने १ ते १९ मार्च या कालावधीत पुण्यात ७५ हजार ९५० जणांवर कारवाई करत तीन कोटी ५२ लाख २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

    पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि उर्वरित ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न वापरणार्‍या आणि रस्त्यांवर थुंकणार्‍यांकडून आतापर्यंत तब्बल २९ कोटी ७३ लाख ८० हजार ८२३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत प्रशासनाकडून कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

    विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मुखपट्टी न वापरणार्‍या नागरिकांना ५०० रुपये, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या नागरिकांवर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रसृत केले आहेत. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरीत ग्रामीण भागात या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दंडाची रक्कम वसूल करण्याचे अधिकार पोलीस, आरोग्य सेवक, महापालिका व ग्रामपंचायत कर्मचारी यांना देण्यात आले आहेत.

    त्यानुसार कारवाईची अंमलबजावणी सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘आतापर्यंत पुणे शहरात सर्वाधिक चार लाख दहा हजार ८२९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधितांकडून १९ कोटी ४१ लाख ३८ हजार ५३८ रुपये दंड आकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ६४ हजार ४८१ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून तीन कोटी ४१ लाख ७३ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर, उर्वरित ग्रामीण भागात दोन लाख २१ हजार ७५७ नागरिकांवर कारवाई करत सहा कोटी ९० लाख ६८ हजार ८८५ एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. अशाप्रकारे शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत सहा लाख ९७ हजार ६७ नागरिकांवर कारवाई करून २९ कोटी ७३ लाख ८० हजार ८२३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.’

    १९ दिवसांत एक लाखांपेक्षा अधिक जणांवर कारवाई
    दुसर्‍या लाटेमुळे शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील अनेक नागरिक घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने १ ते १९ मार्च या कालावधीत पुण्यात ७५ हजार ९५० जणांवर कारवाई करत तीन कोटी ५२ लाख २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्ये १४ हजार ९७४ जणांवर कारवाई करून नऊ कोटी १५ लाख एक हजार रुपये, तर ग्रामीण भागात १३ हजार ९४७ जणांवर कारवाई करत ६४ लाख ६८ हजार ८७५ एवढा दंड आकारण्यात आला आहे.