खाजगी व सार्वजनिक प्रवासासाठी घातलेल्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाई

टॅक्सी, चारचाकी कारमधून प्रवास करताना चालक आणि दोन प्रवासी अथवा आरटीओच्या निर्देशानुसार वाहनांची ५० टक्के क्षमता अशी ही मर्यादा ठेवण्यात आली असल्याचेही सहाय्यक आयुक्त भोसले पाटील यांनी सांगितले.

    पिंपरी : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहनांमधून तसेच सार्वजनिक प्रवासासाठी मर्यादा घालण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात लागू असलेल्या नियमानुसार कारमधून तीन जणांना, तर दुचाकीवरून एका व्यक्तीला प्रवास करण्यास मुभा आहे. जास्त प्रवासी असल्यास संबंधित वाहन चालकावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

    पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील म्हणाले, सार्वजनिक संसाधनांमधून (पीएमपीएमएल) प्रवास करताना ही मर्यादा ५० टक्के एवढी ठेवण्यात आली आहे. पीएमपीएमएल बसच्या आसन क्षमतेच्या केवळ ५० टक्के प्रवाशांनाच बसमधून प्रवास करता येणार आहे.

    तर खाजगी वाहनांसाठी देखील मर्यादा कमी करण्यात आली आहे. टॅक्सी, चारचाकी कारमधून प्रवास करताना चालक आणि दोन प्रवासी अथवा आरटीओच्या निर्देशानुसार वाहनांची ५० टक्के क्षमता अशी ही मर्यादा ठेवण्यात आली असल्याचेही सहाय्यक आयुक्त भोसले पाटील यांनी सांगितले.

    २६ जून रोजी पालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशात सार्वजनिक वाहतुकीबाबत म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच त्यातून प्रवास करता येईल. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून जास्तीत जास्त तीन (चालक + क्लीनर / मदतनीस) जणांना प्रवास करता येईल.

    खाजगी वाहनातून, बसेस व लांब अंतराच्या रेल्वेतून आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी आहे. मात्र प्रवास करणारे वाहन जर शासनाने घोषित केलेल्या लेव्हल पाचमधील ठिकाणी थांबणार असेल तर प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ई-पास असणे बंधनकारक आहे. लेव्हल पाच मध्ये वाहन थांबणार नसेल तर ई-पासची आवश्यकता नाही.