आंबेगाव तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई

                                                                                                                                                                                                                      भिमाशंकर :  तहसिल कार्यालय घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक अनिल पाटील व जयश्री शेंगाळे यांनी दुबार रेशनकार्ड बनवुन देण्यासाठी पैशांची मागणी केल्याने त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली.   

याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे आनंद दगडु डामसे वय- ३०, रा. गोहे खुर्द यांनी दि. ६ मार्च रोजी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ९ मार्च रोजी सापळा पथकातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षिका प्रतिभा शेंडगे, सुप्रिया कादबाने, नागेश देशमुख, एस. आय. करूणाकर व पंचासमक्ष कारवाई करण्यात आली.       

सविस्तर माहिती अशी, तहसिल कार्यालय घोडेगाव येथील पुरवठा विभागामध्ये काम करणारी कंत्राटी कामगार खाजगी महिला जयश्री शेंगाळे यांच्याकडे डामसे यांनी दुबार पिवळे रेशनकार्ड बनवून देण्याकरीता ३०० रूपये लाचेची मागणी केली. त्यावेळी शासकीय फी २० रूपये असताना ३०० रूपये का मागता? असे विचारले असता त्यांनी सांगितले की, डिएसओ ऑफिसला १०० दयावे लागणार, असे सांगितल्यावर पुरवठा निरीक्षक अनिल भाऊराव पाटील यांना भेटलो असता त्यांना शेंगाळे मॅडम रेशनकार्डचे ३०० रूपये मागत असल्याचे सांगितले असता त्यांनी डामसे यांना शेंगाळे यांच्याकडे १०० रूपये देण्याचे सांगितले. त्यामुळे पाटील यांनी शेंगाळे यांना लाच रक्कम देण्यास सांगुन लाच देण्यास प्रोत्साहन दिले.   

याबाबतची मागणीची पडताळणी, सापळा कारवाई पंचासमक्ष ध्वनीमुद्रीत झालेले संभाषण यावरून तहसिल कार्यालयातील अनिल पाटील, जयश्री शेंगाळे यांच्याविरूध्द व आनंद डामसे यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली.