गणेश मूर्ती विक्री स्टॉल वर कारवाई

पुणे  : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा गणेश मुर्ती विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला पदपथांवर स्टॉल उभारण्यास महापालिका प्रशासनाने मनाई केली आहे. पर्याय म्हणून शहराच्या विविध भागातील महापालिकेच्या शाळांच्या आवारात भाडेतत्वावर तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी देखील पदपथावर अतिक्रमण करून उभारलेल्या २५ स्टॉलवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे.
शहरामध्ये दरवर्षी गणेशोत्सवामध्ये सहा लाख मुर्तींची विक्री होते. यामध्ये घरात बसविण्यात येणार्‍या मुर्तींच अधिक असतात. यंदा या मुर्ती विक्रेत्यांना पारंपारिक पद्धतीने यावर्षी रस्त्याच्या कडेला मुर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यास मनाई केली आहे. त्याऐवजी महापालिकेच्या शाळांच्या आवारात स्टॉलसाठी भाडेतत्वावर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेने जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. मात्र याकडे पाठ फिरवत शहरभर अनधिकृत स्टोल उभारण्यात आले आहे. यावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. आता पर्यंत शहरातील विविध भागातून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्टॉल काढले आहेत. यामध्ये औंध मध्ये१७,
बिबवेवाडी-२, विश्रामबागवाडा- २, येरवडा-२,
वारजे-२, अश्या एकूण २५ अनधिकृत मूर्ती स्टॉल काढण्यात आले आहेत.