उरूळी कांचन येथे अवैध धंद्यांवर कारवाई; ७२ जण ताब्यात

    उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा व युनिट ६ च्या पथकाने तीन पत्ती जुगार खेळाचा क्लब व मटक्याच्या धंद्यावर छापा मारून एकूण ७२ जणांना ताब्यात घेतले. ग्रामीण भागातील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते. ७२ जुगाऱ्यांवर एकाचवेळी कारवाई करण्यात आल्यामुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. तर स्थानिक पोलिस नेमके काय करतात असा सवाल नागरिकांना पडला आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्त्याच्या क्लबवर टाकलेल्या छाप्यात ६० जणांवर कारवाई करून १ लाख ४४ हजार २१० रुपये रोख रकमेसह १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी व जुगार खेळण्याची साधने जप्त करण्यात आले आहे. तर युनिट ६ ने मटका अड्ड्यावर घातलेल्या छाप्यात १२ जणांना ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी ९२ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

    उरुळी कांचन भागात पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या हॉटेल गारवानजीक खेडेकर मळा येथे संजय बडेकर याने जुगार अड्डा सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली होती. याची शहनिशा करण्यासाठी उपायुक्त श्रीनिवास घाडगे हे पथकाबरोबर मध्यरात्री त्या ठिकाणी गेले असता त्यांना येथे तीन पानी रम्मीचा खेळ सुरू असल्याचे दिसले. तेथे कारवाई करून ६० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात १५ कामगारांचा समावेश आहे.

    ही कारवाई सुरु असताना युनिट ६ च्या पथकाने येथून काही अंतरावर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावरही छापा टाकून १२ जणांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या दोन्ही कारवाया एका गावात व एकाच वेळी झाल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.