जिल्ह्यातील ४६ रेशन दुकानदारांवर कारवाई

पुणे : लॉकडाउनच्या काळात नागरिकांना शिधापत्रिकेवर धान्य देण्यास टाळाटाळ करणे, दुकान बंद ठेवणे, धान्य वितरणात तफावत असे प्रकार करणाऱ्या शहर आणि जिल्ह्यातील ४६ रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे : लॉकडाउनच्या काळात नागरिकांना शिधापत्रिकेवर धान्य देण्यास टाळाटाळ करणे, दुकान बंद ठेवणे, धान्य वितरणात तफावत असे प्रकार करणाऱ्या शहर आणि जिल्ह्यातील ४६ रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. सात दुकानदारांना दोन लाख ३५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला असून, १० जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

लॉकडाउनच्या काळात नागरिकांना धान्याची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाकडून धान्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, अनेक रेशन दुकानदार हे धान्य देण्यास टाळाटाळ किंवा अन्य गैरप्रकार करीत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भरारी पथके नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या पथकांनी केलेल्या तपासणीत ४६ दुकानदार आढळून आले.
शिधापत्रिकाधारकांना पावती न देणे, धान्याच्या वितरणात तफावत, धान्य देण्यास टाळाटाळ करणे, दुकान बंद ठेवणे, दुकानाबाहेर फलक न लावणे असे प्रकार आढळून आले. कारवाई करण्यात आलेल्या दुकानदारांत पुणे आणि पिंपरी-चिंडवड महापालिकांच्या हद्दीतील १२, तर उर्वरित ग्रामीण भागातील असल्याचे जिल्हा अन्नधान्य वितरण विभागाकडून सांगण्यात आले.