व्हॉटसअॅपवर मटका खेळणाऱ्या  ५ आरोपींवर कारवाई

पुणे ग्रामीण पथकाची कारवाई ; पाच लाख बत्तीस हजार सहाशे पंचवीसचा माल जप्त

यवत : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एल.सी.बी.) पथकाने यवत पोलीस स्टेशन हद्दीतील यवत सहकारनगर येथे अलिशान कारमध्ये व घरात चालणाऱ्या मटका अड्डयावर छापा टाकून ५ आरोपींवर कारवाई करून पाच लाख बत्तीस हजार सहाशे पंचवीसचा माल जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.धक्कादायक बाब म्हणजे हे आरोपी व्हॉटपअॅप चॅटींगवर मटका आकडे व गुगलपे द्वारे पैसे घेवून मटका खेळायचे. 

पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी ग्रामीण भागात चालणाऱ्या अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठीचे आदेश येथील पोलिसांना दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांचे पथक दिनांक दिनांक ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास यवत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना या पथकास यवत सहकारनगर येथे राजू शेंडगे यांच्या घरासमोरील कारमध्ये व घरात मटका जुगार चालू असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे या पथकाने पोलीस हवालदार.शैलेश लोखंडे व संतोष पंडीत यांची मदत घेत सहकारनगर येथील स्कोडा कार नं. एमएच ४३ एबी ७८२९ व राजू शेंडगे यांच्या घरात अचानक छापा टाकून आरोपी  दत्तात्रय दशरथ चव्हाण (वय ३६) रा.कातरखडक (ता.मुळशी), अतिश अंकुश जाधव (वय २२) वर्षे रा.गोणसरी (ता.चिपळूण) जि.रत्नागिरी, संदिप उर्फ धर्मा बबन चव्हाण (वय ३५) वर्षे रा.भोर, जितेंद्र पंढरीनाथ चव्हाण (वय ३२) वर्षे रा.सहकारनगर यवत (ता.दौंड) यांना ताब्यात घेतेले. हे आरोपी फोनवर तसेच व्हॉटपअॅप चॅटींगवर मटका आकडे व गुगल पे द्वारे पैसे घेवून कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना रंगेहाथ सापडले. पुढील अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करत आहेत.