आंबिल ओढा परिसरातील कारवाईवर उपायुक्त सपकाळ यांचे विधान; म्हणाले…

    पुणे : आंबिल ओढा परिसरात महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईवरून पुणे महापालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले. आंबिल ओढा परिसरात केलेली ही कारवाई सर्व नियम पाळून केली आहे, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. या कारवाईपूर्वी नागरिकांना अनेकदा वैयक्तिक आणि वर्तमानपत्रांमधूनही नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.

    कारवाईपूर्वी कोणतीही नोटीस नाही

    महापालिकेकडून जी कारवाई झाली त्यापूर्वी कोणतीही नोटीस मिळाली नाही. फक्त बिल्डरने आपल्याला नोटीस पाठवली होती, असा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या नोटिसीची प्रतही नागरिकांनी दाखवली आहे.

    पोलिस-स्थानिकांमध्ये राडा

    आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिस पोहोचले होते. त्यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापटही झाली. काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नही केला आहे. पोलिस आणि स्थानिकांमध्ये तूफान राडा झाल्याचे पाहिला मिळाले.

    पूर येऊन काही होऊ नये म्हणून खबरदारी

    महापालिकेच्या आयुक्तांसोबतही तीन ते चार वेळा बैठका झाल्या आहेत. त्यामुळे येथील सर्व नागरिकांना २०० मीटरवर असलेल्या राजेंद्रनगरमध्ये पुनर्वसन होणार असल्याचे माहिती होते. सर्वांना तिकडे सुसज्ज फ्लॅट्स पालिकेने दिलेले आहेत. उद्या नाल्याला पूर येऊन काही होऊ नये, यासाठी सध्या हे काम करणं आवश्यक आहे, असे सपकाळ यांनी सांगितले.