खंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांवर कारवाई होणार

गाडी जप्त करण्याचा पोलिसांचा इशारा जेजुरी :साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिर कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने गड व

गाडी जप्त करण्याचा पोलिसांचा इशारा
जेजुरी  : 
साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिर कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने गड व परिसरात ग्रामस्थ व भाविकांना जाण्यास सक्त मनाई आहे.असे असले तरी सध्या राज्याच्या विविध भागातून काही भाविक व नवविवाहित जोडपी खाजगी वाहनाने जेजुरीत येत असल्याचे निदर्शनास आले आहे.अशा भाविकांची गाडी जप्त करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली.विशेष म्हणजे या गाड्यातून येणाऱ्यांमध्ये नवविवाहित जोडप्यांची संख्या जादा आहे.विविध क्लुप्त्या लढवून शासनाकडून पास मिळवुन या गाड्या जेजुरीत येतात.लॉकडाऊनमुळे शुकशुकाट असलेल्या जेजुरीत गाड्या खंडोबा पायथ्याशी पोहोचतात.घाई गडबडीत नवरा नवरीला खाली उतरवुन गडाच्या पहिल्या पायरीवर भंडारा उधळला जातो.याच वेळी नवरा नवरीला पाच पायऱ्या कडेवर घेऊन गड चढतात व लगेचच गाडी मध्ये बसून मार्गस्थ होतात असे प्रकार वारंवार दिसू लागल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला.मुंबई,पुणे आदी भागातूनही गाड्या आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.मराठी संस्कृतीमध्ये लग्न झाल्यावर खंडोबाला जाऊन पाच पायऱ्या बायकोला कडेवर घेऊन गड चढायचा व नंतर प्रपंचाला सुरुवात करायची अशी प्रथा आहे.परंतु सध्या बंदी असल्याने भाविकांनी येणे चुकीचे आहे.अधिकृतरित्या मंदिर उघडल्यानंतर आले तरी चालणार आहे.घरुनच खंडोबाची पुजा करावी.त्यात काही अडचण नाही असे येथील पुजाऱ्यांनी सांगितले.जेजुरी पोलिसांनी गावात अशा गाड्या घुसू नयेत यासाठी विशेष बंदोबस्त लावला आहे.गडाच्या परिसरात जादा लाकडी बांबूचे अडथळे उभे करण्यात आले आहेत.