दौंड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला स्थगिती; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

  दौंड : दौंड नगरपालिकेतील स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेवरून राजकारण पेटले असताना या दोन्ही सभांना येत्या  ७ सप्टेंपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.  याबाबतचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने  दिला असल्याची माहिती नगराध्यक्ष  शीतल  कटारिया व नगरसेवक बबलू कांबळे यांनी दिली.

  दौंड नगरपालिकेत नगराध्यक्ष कटारिया या स्थायी समिती सभा  व सर्वसाधारण सभा वेळेवर बोलवत नाहीत तसेच मनमानी पद्धतीने काम करतात, असा आरोप करीत  राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्यावतीने ६   ते १८ ऑगस्ट पर्यंत नगरपालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले होते. याबाबतच्या तक्रारींवर  जिल्हाधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता उपनगराध्यक्ष विलास शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्याचे आदेश  प्रभारी मुख्याधिकारी संजय पाटील यांना दिले होते.

  परंतु, ही सभा बेकायदेशीर असल्याचे सांगत नगरसेवक  कांबळे आणि नगराध्यक्ष  कटारिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान  दिले. त्यावर झालेल्या सुनावणीत  न्यायमूर्ती एस.  जी.  काठेवाला आणि मिलिंद जाधव  यांनी  या सभेला सात सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली. कटारिया व  कांबळे यांच्या वतीने ऍड.  सुरेश सब्रत, नेहा पोरटे यांनी बाजू मांडली.

  श्रेयवादासाठी आरोप-प्रत्यारोपांची चर्चा

  सभेला स्थगिती मिळाल्याने  विरोधकांना मोठी चपराक बसली आहे. दिवसेंदिवस शहरातील राजकारण गढूळ होत
  चालले असून आगामी   नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष श्रेयवादासाठी आरोप-प्रत्यारोप करत  असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.