बारामतीच्या विठ्ठलाला भेटल्यानंतर ‘यांना’ आनंदाश्रू अनावर

मी माझ्या विठोबाला भेटलो.. हेच मुळात स्वप्नवत कहाणी मी पाहतो आहे. मी स्वप्नाचा प्रवास केला आणि माझ्या जन्मापासून त्यांची राजकीय कारकीर्द अनुभवतो आहे, ते माझे साहेब मला भेटले.. हा आयुष्यातील माझ्या परमोच्च क्षण आहे.माझ्या संपूर्ण आयुष्याएवढी पवार साहेबांची राजकीय सामाजिक कारकिर्द आहे, त्यांना जवळून पाहणे हेच माझे मोठे स्वप्न होते.

बारामती: महाराष्ट्रातील शेतक-यांचे विठ्ठल मानणा-या शेतक-याने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील जवळा गावातून बारामती पायी वारी केल्यानंतर पवार यांची पुण्यात भेट घेतली.
गेल्या अनेक वर्षांची शेतकरी संजय खंदारे देशमुख यांची इच्छा पूर्ण झाल्याने खंदारे देशमुख यांना आनंदाश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांचा विठोबा म्हणून लहानपणापासून शरद पवार यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील जवळा गावचे संजय खंदारे देशमुख हे शेतकरी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी यवतमाळ पासून सहाशे किलोमीटर अंतरावर बारामती पर्यंत चालत आले.२२ दिवसांचा हा पायी प्रवास होता.
बारामती येथील गोविंद बागेत खंदारे देशमुख यांनी भेट दिली, मात्र पवार त्यादिवशी गोविंद बागेत नव्हते. दरम्यान या शेतक-याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड व संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिली.पवार यांनी या शेतक-याला मंगळवारी (दि १५) सायंकाळी पुण्यातील मोदीबागेत भेटण्यासाठी वेळ दिली. या भेटीत तब्बल दोन तास शरद पवार यांनी या शेतक-यासोबत चर्चा केली .शरद पवार विचारपूस करत होते, ती ऐकून त्या शेतकऱ्याला काही सुचले नाही, तो फक्त रडत राहिला.

मी माझ्या विठोबाला भेटलो.. हेच मुळात स्वप्नवत कहाणी मी पाहतो आहे. मी स्वप्नाचा प्रवास केला आणि माझ्या जन्मापासून त्यांची राजकीय कारकीर्द अनुभवतो आहे, ते माझे साहेब मला भेटले.. हा आयुष्यातील माझ्या परमोच्च क्षण आहे.माझ्या संपूर्ण आयुष्याएवढी पवार साहेबांची राजकीय सामाजिक कारकिर्द आहे, त्यांना जवळून पाहणे हेच माझे मोठे स्वप्न होते.विठ्ठलाची वारी भाविक पायी करतात, त्यामुळे शेतक-यांचा विठ्ठल असलेल्या पवार साहेबांच्या भेटीसाठी मी ६०० कि. मी ची पायी वारी केले. आज साहेबांची भेट झाली,आम्ही त्यांना आमच्या शेतकऱ्यांचा विठोबा मानतो. ते मला भेटले यातच माझ्या आयुष्याचं सार्थक झालं- संजय खंदारे -देशमुख. शेतकरी,जवळा, ता.आर्णी, जि. यवतमाळ .