पेरणे-कोरेगाव भीमा मधील बंधारा पुलाची धोकादायक झालेली दुरवस्थेची पाहणी करताना पाटबंधारे खात्याचे अधिकारी.(छायाचित्र-विजय लोखंडे)
        पेरणे-कोरेगाव भीमा मधील बंधारा पुलाची धोकादायक झालेली दुरवस्थेची पाहणी करताना पाटबंधारे खात्याचे अधिकारी.(छायाचित्र-विजय लोखंडे)

-दैनिक नवराष्ट्र बातमी इफेक्ट:दुरुस्तीचे नूतन काम करण्याची अधिकाऱ्यांकडून माहिती

शिरूर-हवेली तालुक्यांना जोडणाऱ्या पेरणे-कोरेगाव भीमा मधील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची धोकादायक दुरावस्था झाली असून बंधारा दुरूस्ती करण्याची मोठ्या प्रमाणावर नितांत गरज असून कोरेगाव भिमा,डिंग्रजवाडी,पेरणेगाव येथील शेती व नागरिकांचे जनजीवन व उद्योगांसाठी आवश्यक असणारे पाणी या बंधाऱ्यावर अवलंबून आहे.पाटबंधारे खात्याचे येथील बंधाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

दैनिक नवराष्ट्र अंकात प्रसिद्ध झालेली या बंधारा पुलाची बातमी

याबाबत “पेरणे-कोरेगाव भीमामधील बंधाऱ्यांची झाली दुरवस्था…पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष:कचऱ्याचे साम्राज्य.” अशी बातमी दैनिक नवराष्ट्र वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच या बातमीची दखल घेत त्वरित पाटबंधारे खात्याचे कोंढापुरी सिंचन शाखा अधिकारी राजाराम माधवराव आहेर,पाटबंधारे खात्याचे स्थापत्य अभियंता टी.पी.अभंग व पाटबंधारे स्थानिक चौकीदार संजय थिटे व खात्याचे कर्मचारी यांनी प्रत्यक्षात या बंधारा पुलावर येऊन झालेल्या धोकादायक दुरवस्थेची पाहणी स्थानिक लोकप्रतिनिधी,शेतकरी वर्ग यांच्या उपस्थितीत केली.याप्रसंगी स्वराज राष्ट्र निर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे,पेरणेचे शेतकरी अनिकेत वाळके,पेरणे तंटामुक्तीचे माजी उपाध्यक्ष दशरथ वाळके,भाजपचे शिरूर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष तानाजी ढेरंगे,आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.याप्रसंगी दैनिक नवराष्ट्र वृत्तपत्राने या बांधऱ्या पुलाच्या धोकादायक दुरवस्थेबाबत बातमी स्वरूपात वाचा फोडल्याने स्थानिक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी दैनिक नवराष्ट्र वृत्तपत्राचे आभार मानले.असे पेरणे तंटामुक्तीचे माजी उपाध्यक्ष दशरथ वाळके यांनी सांगितले.

हा बंधारा जुना असून याद्वारे भीमा नदीचे पाणी अडवण्यास मदत होते,बऱ्याच वर्षांपासून बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे.बंधाऱ्याच्या साहित्य ठेवण्यासाठी राखीव ठेवलेली जमीन असून सुद्धा या बंधाऱ्याचे लोखंडी गंजलेले ढापे कुठेही अस्तव्यवस्त पडलेले आहेत.आम्ही बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याच्या कामाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे.यापुढे लक्ष घालून दुरुस्तीचे त्वरित कामे झाली नाही तर याची वरिष्ठांकडे तक्रार करू.

-अनिकेत वाळके,स्थानिक शेतकरी,पेरणे

“या बंधाऱ्याच्या झालेल्या दुरवस्थेची आम्ही पाहणी केली असून,याच्या दुरवस्थेचा आमच्या पाटबंधारे वरिष्ठ कार्यालयाकडे दुरुस्तीचा कामाचा प्रस्ताव सादर करून या बंधारा पुलाचे दुरुस्तीचे नूतन काम लवकरात लवकर करू.येथील बंधाऱ्याबाबत असलेले स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न नक्कीच यापुढे सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
  -राजाराम माधवराव आहेर,कोंढापुरी सिंचन शाखा अधिकारी-पाटबंधारे खाते.