ग्रामसेवकाच्या बापाची पेंड आहे काय?; पथदिवे दिवसा सुरु असल्याने अजितदादा संतप्त

    कन्हेरी (बारामती) : येथे कृषी विभागाची फळरोपवाटिका पाहण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिवसा पथदिवे सुरू असल्याचे लक्षात आल्याने ते चांगले संतापले. ग्रामसेवक काय करतो?, त्याच्या बापाची पेंड आहे का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री पवार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सदर ग्रामसेवकाला नोटीस काढण्याचे आदेश दिले.

    अजित पवार शनिवारी (दि. ५) बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होते. सकाळी साडेआठच्या सुमारास कन्हेरी परिसरातील फळ रोपवाटिकेची पाहणी करण्यासाठी ते आले ‌होते. यावेळी भरदिवसा पथदिवे सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. उपमुख्यमंत्री पवार यांनी हा जनतेचा पैसा आहे, ग्रामसेवक काय करतो, त्याच्या बापाची पेंड आहे काय, असा सवाल करत टाइमिंगलाच लाईट बंद झाली पाहिजे, असे खडेबोल सुनावले. ग्रामसेवकाला तातडीने नोटीस काढण्याचा आदेश त्यांनी यावेळी दिला.

    दरम्यान, या परिसराची पाहणी करत असताना अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना विविध सूचनाही दिल्या.