राज्यातील सर्व महापालिका लढवणार; आम आदमी पक्षाची मोठी घोषणा

देशाची वाटचाल आफगाणिस्थानच्या दिशेने सुरू आहे, तर राज्याची स्थिती वरचेवर खालावत आहे. राज्याची खिळखीळीत होत असलेली चौकट आम्हाला पुन्हा घट्ट करायची आहे.

    पुणे : आम आदमी पक्ष (आप) संपूर्ण ताकदीने राज्यातील आगामी महापालिकेच्या निवडणुक लढविणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वच जागा लढवणार आहे, अशी घोषणा आपच्या प्रदेश पदाधिकार्‍यांनी गुरूवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.

    आगामी महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपच्या वतीने विविध शहरांमध्ये आढावा बैठका घेतल्या जात आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची बैठक नुकतीच झाली. ही बैठक आपचे प्रदेश संयोजक व प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर मध्यान यांच्या उपस्थितीमध्ये झाली. या बैठकीला प्रदेश संघटक विजय कुंभार, प्रदेश सचिन धनंजय शिंदे व जिल्हाअध्यक्ष मुकुंद किर्दत यांच्यासह आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राचुरे म्हणाले, शहरी चेहरा असलेल्या आमच्या पक्षाला ग्रामीण भागामध्ये चांगले यश मिळाले आहे. आम्ही राज्याच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम आम्ही करणार आहोत. त्या अनुशंगाने आम्ही पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे व खडकी कँटोन्मेंट यांसह राज्यातील सर्वच महापालिकेच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत.

    किशोर मध्यान म्हणाले, देशाची वाटचाल आफगाणिस्थानच्या दिशेने सुरू आहे, तर राज्याची स्थिती वरचेवर खालावत आहे. राज्याची खिळखीळीत होत असलेली चौकट आम्हाला पुन्हा घट्ट करायची आहे. यासाठी प्रत्येक शहरात दिल्लीचे मॉडेल राबवण्याचे आमचे नियोजन आहे. तर पुणेकरांच्या समस्या कोणत्या आहेत, याचा विचार करून आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करू, अशी माहिती कुंभार यांनी दिली.