पुरंदरमध्ये युती, आघाडीची शक्यता धूसर; राजकीय पक्षांकडून स्वबळाची तयारी

    सासवड : पुरंदर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे दिसून येते आहे. पुरंदर तालुका हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जायचा, आता काँग्रेस पार्टी देखील चांगल्याप्रकारे वाढली आहे. शिवसेनेचे आपली पाळेमुळे खोलवर पसरवण्याचे काम सुरू केले आहे, तर भारतीय जनता पार्टीने आपला जनसंपर्क वाढवला आहे.

    राजकीय पक्षांकडून स्वबळाची तयारी

    त्यामुळे पुरंदर तालुक्यात हे चारही प्रमुख राजकीय  पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. स्वबळाच्या निवडणुकीमुळे कार्यकर्ते संभ्रमात असून, पक्षाचे कोठे, किती बळ वाढवणे गरजेचे आहे, याची चाचपणी सुरू झाली आहे.

    खमक्या उमेदवार असेल तर टिकू शकतो, असा सूर कार्यकर्त्यांकडून एकावयाला मिळत आहे. तर काही ठिकाणी पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणायचाच असा विचार चालू आहे. यंदा पुरंदर तालुक्यात सगळ्याच पक्षांची कसोटी आहे. सर्व पक्ष स्वबळाचा नारा लावत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, काॅग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्यात खरी लढत होणार आहे. राज्यात युती असली तरी तालुक्यात युती होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.