अभ्यासिकांना निकषात परवानगी द्या ; महापौरांची आयुक्तांना सूचना

पुणे : विद्येचे माहेर तसेच स्पर्धा परिक्षांचे म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहरात १०० पेक्षा जास्त अभ्यासिका आहेत. त्यामुळे अनेक राज्यांतून, जिल्हयांतून शिक्षणासाठी तसेच विविध स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी पुणे शहरात येतात. त्यामुळे आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शहरातील अभ्यासिकांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परवानगी देण्यात यावी, अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांकडे केली आहे. यावर लवकरच निर्णय होणार असून अभ्यासिका सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एमपीएससी, यूपीएससी, नीट आदी स्पर्धा परिक्षा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिक्षांच्या तयारीसाठी लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी पुणे शहरात दाखल झाले आहेत.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘संपूर्ण वर्षभर विद्यार्थी या परिक्षेचा अभ्यास करत असतात. मात्र अभ्यासिका बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पोषक वातावरण मिळत नाही. तरी, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे निकष पाळून अभ्यासिका सुरु करण्यास परवानगी देण्याची सूचना आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे’.