सायंकाळी पाचपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्या; श्रीचंद आसवाणी यांची मागणी

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात एक जूनपासून ‘ब्रेक द चेन ३’ अंतर्गत सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत दुकाने उघडण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी परवानगी दिली आहे. मात्र, सकाळी सात ते अकरापर्यंत ग्राहक येतच नाहीत. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना सकाळी अकरा ते सायंकाळी पाच पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

    कोरोनाच्या महामारीमुळे मागील आर्थिक वर्षात अनेकदा लॉकडाऊनमुळे दुकाने बंद ठेवावी लागली. आता एक जून पासून अंशता दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल फेडरेशनच्या वतीने आयुक्तांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. परंतू सकाळी सात ते अकरा पर्यंत ग्राहक येत नसल्यामुळे चार तास विनाकारण वाया जातात. त्या ऐवजी दुकाने उघडण्यास अकरा ते पाच अशी परवानगी दिल्यास व्यापाऱ्यांची तसेच ग्राहकांचीही सोय होईल.

    आयुक्त तसेच महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही व्यापाऱ्यांच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, तसेच सर्व व्यापाऱ्यांनी शासनाने कोविड विषयीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असेही आवाहन श्रीचंद आसवाणी यांनी केले आहे.