आंबेगाव पंचायत समिती आढावा बैठकीत सदस्यांचा गदारोळ

भिमाशंकर : जिल्हा परिषदेने आयोजित करण्यात आलेल्या आंबेगाव तालुका पंचायत समिती आढावा बैठकीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना बोलविण्यात आले. मात्र पंचायत समिती सदस्य यांना बोलविण्यात आले नसल्याने

भिमाशंकर :  जिल्हा परिषदेने आयोजित करण्यात आलेल्या आंबेगाव तालुका पंचायत समिती आढावा बैठकीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना बोलविण्यात आले. मात्र पंचायत समिती सदस्य यांना बोलविण्यात आले नसल्याने पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखिले, राजाराम बाणखेले यांनी निषेध व्यक्त करत गदारोळ घातला.  

आंबेगाव तालुका पंचायत समितीमध्ये दि. ११ रोजी जिल्हा परीषदेने आंबेगाव तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले उपस्थित होते. पंचायत समिती सदस्यांनी आढावा बैठक सुरू होण्यापुर्वी जिल्हा परिषदेतील संबंधित अधिका-यांना उपरोक्त सवाल केला की, पंचायत समिती सदस्यांना जिल्हा परिषदेमध्ये मान दिला जात नाही किंवा आंम्हाला बोलविले जात नाही. तालुक्याचे प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेत मांडावेत. पंचायत समिती सदस्याने पंचायत समितीत मांडावे असा नियम आहे. पण संबंधित अधिकारी तालुक्यातील मिटींगला आमंत्रण देत नाही, अचानक मिटींग घेतात. तालुक्यात घेण्यात येत असलेल्या आढावा बैठकीमध्ये आठ पंचायत समिती सदस्यांना बोलविणे अपेक्षित होते, येथुन पुढे असे घडू नये अशी मागणी यावेळी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजंखिले व राजाराम बाणखेले यांनी केली.    

यावेळी संबंधित अधिकारी यांनी यास दुजोरा देत यापुढे पंचायत समिती सदस्यांना बोलविण्यात येईल असे सांगितल्या नंतर आढावा बैठक चालू झाली. या आढावा बैठकीमध्ये माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्या अरूणा थोरात, रूपाली जगदाळे, तुलशी भोर, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे आदि उपस्थित होते.   

पंचायत समिती आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण, महिला बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, छोटे पाटबंधारे, पशुसंवर्धन, बांधकाम आदि विविध पंचायत समिती अंतर्गत विभागांचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला.