आंबेगाव तालुक्यात चक्रीवादळामुळे ६२ अंगणवाडी व प्राथमिक शाळांचे कोटयावधी रूपयांचे नुकसान

                                                                                        

 भिमाशंकर :  निसर्ग चक्रीवादळाने आंबेगाव तालुक्यात वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे ६२ अंगणवाडी व प्राथमिक शाळांनाही जबर तडाखा बसला आहे. सुमारे एक कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.  

निसर्ग चक्रिवादळामुळे २८ अंगणवाडी, ३४ प्राथमिक शाळांच्या छतांचे, किचनशेडचे पत्रे उडाले. तसेच इमारतीला तडे जाणे, खिडकी, दरवाजे, स्वच्छतागृह, पाण्याची टाकी, संरक्षक भिंत, शाळेतील शैक्षणिक साहित्य, कागदपत्रे आदिंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेवाडी, जांभोरी, फलोदे, हरणमाळ, मेघोली, न्हावेड, पांचाळे खुर्द, जांभळेवाडी, मापोली, म्हतारबाचीवाडी, काळवाडी, बेंढारवाडी, दरेवाडी, उंबरवाडी आदि शाळांचा यात समावेश आहे. यातील काही इमारती धोकादायक झालेल्या आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर विदयार्थी बसणार कोठे? जिल्हा परीषद व तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याकडून पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे. पण निधी उपलब्ध होणार कधी व दुरूस्ती कधी करायची, असा प्रश्न शालेय व्यवस्थापन समितीला पडला आहे.   

सोमवारी (दि. १५) रोजी शाळा सुरू करण्यातचे शिक्षण विभागाचे नियोजन सुरू आहे. आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील बहुतेक शाळा इमारती या स्लॅबच्या आहेत. पण पश्चिम भागात मात्र याउलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. जुन्या प०याच्या इमारती दुरवस्थेमुळे धोकादायक बनल्या आहेत. यामध्ये उखडलेले प्लॅस्टर, तुटलेली दारे, गळके वर्ग, फुटक्या फरशा तसेच संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय, लाईट नाही आदि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तर पावसाळयात जुन्या जीर्ण झालेल्या इमारतींमुळे पाऊस पडला की वर्गात पाणी गळू लागते. शाळेतील भिंती जीर्ण झाल्याने विदयार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा मागणी केल्यावर धातुर मातूर दुरूस्ती केली जाते.  

जिल्हा परीषदेकडे समग्र शिक्षा अभियान मोहिमेअंतर्गत कोटयवधी रूपये पडून आहेत. परंतू वरिष्ठ अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे नवीन इमारत बांधकाम प्रस्ताव तसेच धूळखात पडून आहे. पावसाळयात वर्गात बसणे त्रासदायक असल्याने विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही एैरणीवर आला आहे. याकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.