“आंबेगाव तहसिलदार यांनी मोठया बहिणीसारखी काळजी घेतली” ; कोरोनाबाधित रुग्णांनी व्यक्त केल्या भावना

भिमाशंकर : आंबेगाव तहसिलदार यांनी आमच्या मनातील कोरोना विषाणू या आजाराविषयीची भीती दूर करत धीर दिला आणि हॉस्पिटलमध्ये वारंवार येऊन तब्यतीची विचारणा करून मोठया बहिणी सारखी काळजी घेतली. तसेच

भिमाशंकर :  आंबेगाव तहसिलदार यांनी आमच्या मनातील कोरोना विषाणू या आजाराविषयीची भीती दूर करत धीर दिला आणि हॉस्पिटलमध्ये वारंवार येऊन तब्यतीची विचारणा करून मोठया बहिणी सारखी काळजी घेतली. तसेच कोव्हीड सेंटर मधील डॉक्टर व नर्स यांनी आमची घरच्या प्रमाणे काळजी घेत वेळेवर जेवण, नाष्टा, औषधे दिल्याबद्दल आंम्ही खूप आभारी आहे, असे मत कोरोनाबाधित रूग्ण यांनी आपली भावनिक प्रतिक्रया व्यक्त केली.       

आंबेगाव तालुक्यातील कोरोना बाधित व्यक्तिंना उपचारानंतर त्यांना कोव्हिड सेंटर मंचर व भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल मंचर या ठिकाणाहून १० जणांना दि. ८ रोजी गुलाब पुष्प व फुलांची उधळण करत घरी सोडण्यात आले, त्यावेळी कोरोना बाधित व्यक्तिंनी आपले मत व्यक्त केले. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांच्या हस्ते रूग्ण व डॉक्टर नर्स यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका वैदयकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदिप पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.    

आंबेगाव तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तिंची संख्या ४३ होती. या बाधित व्यक्तिंमधील पहिले १० व्यक्ति उपचारानंतर घरी सोडण्यात आले. दि. ७ रोजी पेठ येथील दोन व गिरवली येथील एक असे कोरोना बाधित व्यक्तिंस रात्री घरी सोडण्यात आले. तर दि. ८ रोजी सकाळी वडगाव काशिंबेग येथील सात व उगलेवाडी येथील तीन कोरोना बाधित रूग्ण असे १० जणांना कोव्हिड सेंटर मंचर व भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल मंचर या ठिकाणाहून प्रशासनाच्या उपस्थितीत रूग्णांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले.    

नारोडी येथील एका व्यक्तिचा बळी गेला तर २३ बाधित व्यक्ति उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आता ४३ पैकी फक्त १९ कोरोना बाधित व्यक्तिंवर उपचार चालू असुन यातील १० जणांवर भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल मंचर येथे व ९ व्यक्तिंवर पुणे येथे उपचार चालू असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.