Fraud

प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.

    पिंपरी : प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

    आबासाहेब वसंतराव भोसले (वय ४५, रा. तळेगाव दाभाडे), योगेश विठ्ठल ढोले (वय ३१, रा. मांजरी, ता. हवेली, मूळगाव अग्रण धुळगाव, ता. कवठे महाकाळ, जि. सांगली), माउली विजय गोलांडे, निशा माउली गलांडे (दोघेही रा. वडगाव शेरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी तळेगाव दाभाडे तसेच निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

    पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र बबन शिंदे (रा. रुपीनगर, तळवडे) तसेच त्यांचे नातेवाईक आणि सहकारी यांची आरोपी आबासाहेब भोसले, योगेश ढोले यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून चिखलीतील ‘घरकुल’मध्ये व्हीआयपी कोट्यातून घर व गाळा मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी ७ लाख ६२ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाने आरोपी भोसले आणि ढोले यांना १६ ऑगस्टला ताब्यात घेतले. निगडी पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून चार लाख रुपये जप्त केले.

    दुसऱ्या प्रकरणात फसवणूक झालेली महिला किरण मधुकर साबळे (वय ३२, रा. सीआरपीएफ कॅम्प, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रधानमंत्री घरकुल योजनेतून व्हीआयपी कोट्यातून चिखली येथील प्रकल्पात एक रूम मिळवून देतो, असे आरोपी आबासाहेब भोसले याने सांगितले. त्यानंतर फिर्यादी तसेच वैशाली सातकर, पुरुषोत्तम राऊत, सीमा गायकवाड, देढे यांच्याकडून पैसे घेऊन फसवणूक केली. या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांची विल्हेवाट लाण्यात येणार असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली.

    आरोपी भोसले याची पत्नी सपना हिने तिचे नातेवाईक असलेले आरोपी माउली आणि निशा गलांडे यांच्याकडे ती कागदपत्रे दिली असून, ते दोघेही नातेवाईक एका रिक्षातून जात होते. त्यावेळी देहूरोड येथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून कागदपत्रे हस्तगत केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी माउली व निशा गलांडे यांना अटक केली.