उसन्या पैशाच्या वादातून मित्राने दुसऱ्या मित्राला दिले पेटवून

संताप अनावर झाल्याने आरोपी मनोज याने संतोष यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत पेटवलं. या दुर्दैवी घटनेत संतोष कागदे गंभीररित्या भाजले.

    पुणे: उसन्या घेतलेल्या पैशावरून झालेल्या वादामुळे संतप्त झालेल्या मित्राने दुसऱ्या मित्राला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना हडपसर येथे घडली आहे. या भयानक घटनेत पीडीत आरोपीचा ससून रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला आहे.आरोपीने आपल्या मित्राने केलेल्या मदतीची भयंकर पद्धतीने केलेली परतफेड परिसराटा चर्चेचा विषय ठरली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

    संतोष दादाराव कागदे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते हवेली तालुक्यातील आंबेगाव बुद्रुक येथील रहिवासी आहेत. तर मनोज मोहन कांदे असे अटक केलेल्या आरोपी मित्राचे नाव असून तो फुरसुंगी परिसरातील संकेत विहार येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कागदे यांनी काही दिवसांपूर्वी आरोपी कांदे याला काही पैसे उसने दिले होते. पैसे उसने घेऊन बऱ्याच दिवसांपासून आरोपी पैसे परत देत नव्हता.

    यामुळे मृत संतोष कागदे आणि आरोपी मनोज कांदे यांच्या वाद होऊ लागला. उसन्या पैशांवरून दोघांत अनेकदा वाद झाला. दरम्यान गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास दोघंही फुरसुंगीतील संकेत विहार परिसरात एका विहिरीजवळ भेटले. याठिकाणी दोघांत पुन्हा उसन्या पैशांवरून वाद झाला.

    यावेळी संताप अनावर झाल्याने आरोपी मनोज याने संतोष यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत पेटवलं. या दुर्दैवी घटनेत संतोष कागदे गंभीररित्या भाजले. यानंतर काही स्थानिक नागरिकांनी कागदे यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असताना, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कागदे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.