जेजुरीतील कडेपठारच्या डोंगरात रंगला गणपुजेचा आनंद सोहळा

खंडोबाला भंडाऱ्याची शेज, आकर्षक फ़ुलांची सजावट जेजुरी : साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी येथील कडेपठारच्या डोंगरातील मुळ स्थान असलेल्या खंडोबा मंदिरामध्ये गणपुजा उत्सव

खंडोबाला भंडाऱ्याची शेज, आकर्षक फ़ुलांची सजावट

जेजुरी :
साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी येथील कडेपठारच्या डोंगरातील मुळ स्थान असलेल्या खंडोबा मंदिरामध्ये गणपुजा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मणीसुर व मल्लासुर या दैत्यांचा वध करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला. हा दिवस आषाढ शुद्ध प्रतिपदेचा असल्याने सर्व देवगणांनी भंडारा वाहून देवाची पुजा केली होती म्हणुन हा उत्सव कडेपठार डोंगरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जयाद्रि पर्वताच्या रांगेतील निसर्गाने संपन्न असलेल्या या उत्सवासाठी दरवर्षी हजारो भाविक येतात. परंतु यंदा कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे यात्रा रद्द करण्यात आली. मोजके पुजारी व मानकरी यांनी शासनाचे सर्व नियम पाळून उत्सव साजरा केला. या वेळी  मंदिरामध्ये पुजा, आरती व छबिना असे कार्यक्रम झाले. वाणी, रामोशी, गुरव, कोळी, वीर घडशी , वाघ्या-मुरुळी गोंधळी यांनी गणपुजेचे नियोजन केले. निलेश बारभाई यांनी आकर्षक फुलांची सजावट केली. काल रात्री साडेआठ वाजता गणपुजेला सुरुवात झाली. रात्री सागर मोरे, समीर मोरे, ज्ञानेश्वर मोरे यांनी छबिना काढला. मुन्ना बारभाई यांनी आरती केली तर रमेश सोनवणे व रविंद्र नवगिरे यांनी मानाची दिवटी पाजळली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त नितीन कदम, सचिव सदानंद बारभाई, सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने उपस्थित होते. ग्रामस्थांच्यावतीने मानकऱ्यांनी खंडोबा म्हाळसा देवीच्या स्वयंभु लिंगाला  येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करीत पिवळ्याधमक भंडाऱ्याची शेज केली. यानंतर मंदिर बंद करण्यात आले. आज पहाटे मंदिर उघडल्यावर देवाच्या स्वयंभु लिंगावरील भंडारा जमा करून जेजुरीतील मुख्य चौकात प्रसाद म्हणून वाटण्यात आला.