मुलगी झाल्याचा आला राग, संतप्त पतीने गळा दाबून केला पत्नीचा खून

मावळ तालुक्यात चादखेड गावात मुलगी झाल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला.

    वडगाव मावळ : मावळ तालुक्यात चादखेड गावात मुलगी झाल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. पत्नी रात्री झोपेत असताना पतीने हा गुन्हा केला. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ येथे उघडकीस आली.
    चांगुणा योगेश जाधव (वय 20, रा. चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याबाबत शवाजी दामू ठाकर (वय 43, रा. ठाकरवाडी, परंदवाडी, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी योगेश कैलास जाधव (वय 26) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत चांगुणा आणि आरोपी योगेश हे पती-पत्नी असून ते चंदनवाडी येथे राहत होते. चांगुणा हिला पहिली मुलगी झाली. या कारणावरून योगेशने तिचा वेळोवेळी हाताने मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ केला.
    दरम्यान, शुक्रवारी (दि. 27) रात्री आठ वाजता चांगुणा झोपी गेली. रात्री झोपेत योगेश याने चांगुणाचा गळा दाबून खून केला. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आला. पोलिसांनी योगेशला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गाडीलकर तपास करीत आहेत.