पंचतारांकित हॉटेलातील लग्नसोहळ्यात खंडणी उकळल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल; पुना असोसिएशनकडून पोलीस आयुक्तांची भेट

  पुणे : पंचतारांकित हॉटेलात होणाऱ्या बड्या हस्तींच्याच लग्न सोहळ्यात आडकाठी आणत खंडणीप्रकरणात आज पोलीस आयुक्तांची पुना हॉटेलियर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. बैठकीत आयुक्तांसमोर त्यांनी त्यांच्या अडचणी मांडत या कंपन्यांकडून त्रास देण्यात आल्याचे सांगितले. आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन देत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तत्पुर्वी या कंपनीवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

  पोलीस आयुक्तालयात सोमवारी दुपारी ही बैठक पार पडली. यावेळी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, असोशियसनचे अध्यक्ष शरण शेट्टी, विक्रम शेट्टी, संजयसिंग यांच्यासह १४ पदाधिकारी उपस्थित होते.

  शहरातील पंचतारांकित हॉटेलात होणाऱ्या लग्नसोहळ्यात कॉपीराईटच्या नावाखाली खंडणी घेतल्याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड (पीपीएल) आणि नोव्हेक्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लि.मी. कंपनीचे संचालक, पदाधिकारी तसेच फिल्ड ऑफीसर्स यांच्यासह इतरावर गुन्हा नोंदवला आहे.

  या कंपन्यांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी अशाप्रकारे अनेक ठिकाणी जाऊन खंडणी उकळली असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीसांकडे तक्रारी येण्यास सुरूवात झाली आहे. त्यानंतर या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची पुना हॉटेलर्स असोशिएशनने भेट घेतली. यावेळी त्यांनी या कंपन्या थेट लग्न सोहळ्यात जबरदस्तीने घुसून शुटिंग करत असे. तर, हॉटेल्स मालकांना थेट फोनकरून धमकी देत होते. त्यानंतर मेलद्वारे त्यांना नोटीस देखील पाठवित असत. यासोबतच यावेळी त्यांनी इतर अडचणी देखील आयुक्तांसमोर सांगितल्या. पोलीस आयुक्तांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

  येरवड्यात दुसरा गुन्हा दाखल

  येरवडा परिसरातील देखील एका पंचतारांकित हॉटेलात साखरपुडा सुरू असताना या कंपनीकडून त्यांना अशाचप्रकारे भीती दाखवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हॉटेल मालक विक्रमराज सदानंद शेट्टी (वय ४६) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड (पीपीएल) आणि नोव्हेक्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लि.मी. कंपनीचे संचालकांसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.