समाविष्ट २३ गावांतील नागरिकांच्या प्राथमिक सुविधांचे अर्ज ; महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी उभारली यंत्रणा

समाविष्ट ग्रामपंचायतींची कार्यालये ही संपर्क कार्यालय म्हणून वरिल क्षेत्रिय कार्यालयाच्या नियंत्रणाखाली काम करणार आहेत. या कामकाजासाठी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी या संपर्क कार्यालयात एका वरिष्ठ लिपिक व त्यावरील अधिकार्‍याची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करायची आहे.

    पुणे :  महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांतील नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी तसेच नागरिकांच्या प्राथमिक सुविधांसाठी तात्पुरती यंत्रणा कार्यरत केली आहे. समाविष्ट करण्यात आलेली गावे नजीकच्या क्षेत्रिय कार्यालयांना जोडणत आली असून नागरिकांनी या क्षेत्रिय कार्यालयाकडील संबधित विभागांकडे आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

    औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक ( हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय), कोंढवे- धावडे, कोपरे (वारजे- कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय), गुजर निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी (कोंढवा- येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय), वाघोली (नगररोड- वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालय), जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी (धनकवडी- सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय), नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, नांदोशी, सणसनगर, नर्‍हे (सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय), म्हाळुंगे, सूस (औंध- बाणेर क्षेत्रिय कार्यालय), बावधन बुद्रुक (कोथरूड- बावधन क्षेत्रिय कार्यालय).

    समाविष्ट ग्रामपंचायतींची कार्यालये ही संपर्क कार्यालय म्हणून वरिल क्षेत्रिय कार्यालयाच्या नियंत्रणाखाली काम करणार आहेत. या कामकाजासाठी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी या संपर्क कार्यालयात एका वरिष्ठ लिपिक व त्यावरील अधिकार्‍याची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करायची आहे. या संपर्क अधिकार्‍याने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांचे दैनंदीन कामकाज करायचे आहे. प्रामुख्याने जन्म- मृत्यूचे दाखल्याबाबतचे अर्ज, नळजोडाचे अर्ज, बांधकाम परवानगीबाबतचे अर्ज, कर आकारणी कर संकलनाचे अर्ज गोळा करून संबधित विभागाकडे पाठविण्याची जबाबदारी ही संपर्क अधिकार्‍यांवर राहाणार आहे. १८ जुलैपर्यंत संबधित क्षेत्रिय अधिकार्‍यांनी याची पुर्तता करून कामकाज सुरू करावे, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.