नामफलक मराठी भाषेत लावा ; धर्मादायुक्तांनी दिला आदेश

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असुनही अनेक वेळा याचा विसर पडतो. काहीवेळा हेतुपुरस्सर पुरोगामित्व प्रदर्शित करायला इंग्रजीचा आधार घेतला जातो. आता राज्याच्या धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी ट्रस्ट आणि संस्थासाठी आदेश काढला आहे.’’

    पुणे : राज्यातील सर्व नाेंदणीकृत ट्रस्ट, संस्थांनी त्यांचे नामफलक मराठी भाषेत लिहून दर्शनी भागात लावावेत असे आदेश धर्मादायुक्तांनी काढले आहे. याची अंमलबजावणी काल म्हणजे शिवराज्याभिषेकदिनापासून केली जाणार आहे.

    यासंदर्भात पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे विश्वस्त अॅड. शिवराज कदम यांनी माहीती कळविली आहे. ते म्हणाले, ‘‘ मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असुनही अनेक वेळा याचा विसर पडतो. काहीवेळा हेतुपुरस्सर पुरोगामित्व प्रदर्शित करायला इंग्रजीचा आधार घेतला जातो. आता राज्याच्या धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी ट्रस्ट आणि संस्थासाठी आदेश काढला आहे.’’

    या आदेशानुसार तरारे यांनी राज्यातील सर्व नोंदणीकृत ट्रस्ट व संस्थांनी आपले नामफलक मराठी भाषेत लिहून दर्शनी भागात लावण्याचे महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. मराठीतून नामफलक लावले जात आहेत की नाही याचा सर्व विभागीय सह धर्मादाय आयुक्तांनी उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांमार्फत याचा अनुपालन अहवाल द्यावा असेही या आदेशात नमूद केले आहे. धर्मादाय न्यास हे समस्त जनतेसाठी असतात. त्यांची समग्र माहिती राज्यातील गरजू व्यक्तींना मराठीतून मिळावी यासाठी हे निर्देश उपयुक्त होतील. यामुळे मायबोलीतील नामफलक अनिवार्य करण्याच्या निर्णयाचे स्वागत असल्याचे कदम यांनी नमूद केले.