जिल्हास्तरावरील अपीलीय सुनावणीशिवायच नेमला नवीन केंद्रचालक

  माळशिरस : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या आंबळे ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. या ठिकाणी असणाऱ्या सीएससी कक्षातील केंद्रचालकांना कामावरून काढण्याचा घाट ग्रामपंचायत कार्यकारिणीने घातला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद पुणे यांच्याकडील सुनावणी होण्याआधीच सीएससी कंपनीने ग्रामसेवकांच्या मदतीने नवीन केंद्रचालक नियुक्त केला आहे.

  आंबळे ग्रामपंचायतमध्ये गेल्या सहा ते सात वर्षांपासून रंजना गायकवाड या संगणक कक्षात केंद्रचालक या पदावर कार्यरत आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यकारिणीने निवडून येताच काही पदाधिकाऱ्यांच्या नातलगांना कामावर घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव करून रंजना गायकवाड यांना ग्रामपंचायतीमध्ये येण्यास मज्जाव केला व रंजना गायकवाड या कामावर येत नाहीत अशा आशयाची पत्रे वरिष्ठ कार्यालयास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठवण्यात आली. या प्रकरणी गटविकास अधिकारी पुरंदर यांनी सुनावणी घेतली. त्या सुनावणीच्या निर्णयाविरोधात रंजना गायकवाड यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे अपील केले होते. त्या अपिलाच्या सुनावणीचा निकाल न लागताच नवीन केंद्रचालक नियुक्ती करण्यामागे ग्रामपंचायतीचा किंवा ग्रामसेवकांचा हात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  दलित महिला असल्याने काम करू देत नाहीत : रंजना गायकवाड

  ”मी गेल्या सहा ते सात वर्षांपासून ग्रामपंचायत आंबळे याठिकाणी केंद्रचालक या पदावर कार्यरत असून, मागील दोन वर्षांपासून मला मानधन मिळाले नाही. त्याबाबतीत मी वरिष्ठ कार्यालयात वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र, नवीन कार्यकारिणीने राजकीय आकसापोटी माझ्यावर खोटे आरोप करून माझ्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी जाणून न घेता व मला विचारात न घेता मला कामावरून कमी करण्याचा घाट घातला आहे. मी एक दलित महिला असल्यामुळे मला त्या ठिकाणी काम करू द्यायचे नाही व कार्यकारिणीतील काही सदस्यांचे नातलग कामावर ठेवण्यासाठी मला कामावरून कमी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत”, असे आंबळे ग्रामपंचायतीच्या केंद्रचालक रंजना गायकवाड यांनी सांगितले.

  नवीन केंद्रचालकाची नेमणूक कंपनीमार्फत : गोरोबा वडवले

  ”नवीन केंद्रचालकाची नेमणूक ही कंपनीमार्फत झाली आहे. या नेमणुकीसंदर्भात मला काही माहीत नाही”, असे आंबळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गोरोबा वडवले यांनी सांगितले.

  नवीन नियुक्तीचा अधिकार सीएससी कंपनीचा : अमर माने

  ”शासनाच्या जीआरनुसार या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा अधिकार माझा होता. मात्र, नवीन नियुक्तीचा अधिकार हा सीएससी कंपनीचा आहे”, असे पुरंदरचे गटविकास अधिकारी अमर माने यांनी सांगितले.