महापालिकेचे क्रेडिट रेटींग करून घेण्यासाठी आणखी एका संस्थेची नेमणूक

    पिंपरी : ‘द गॅझेट ऑफ इंडिया’ एक्स्ट्राऑर्डनरी पार्ट ३, सेक्शन ४ पब्लिश बाय अ‍ॅथोरिटी, नवी दिल्ली यांच्याकडील १५ जुलै २०१५ रोजीच्या नोटिफिकेशनमधील चाप्टर तीन अन्वये महापालिकेचे क्रेडिट रेटींग कमीत कमी एका संस्थेमार्फत अथवा एकापेक्षा अधिक संस्थांकडून क्रेडिट रेटींग करून घेण्याबाबत नमूद केले आहे. त्यानुसार, इतर महापालिकांची माहिती घेण्यात आली असता त्यांनी एकापेक्षा जास्त संस्थांकडून क्रेडिट रेटींग करून घेत आहेत.

    पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०० कोटी बाँड इश्यूचे कामकाज सध्या अंतिम टप्प्यात चालू आहे. क्रिसील लिमिटेड या संस्थेकडून सद्यस्थितीत २०० कोटी रूपये कर्जासंदर्भात महापालिकेचे क्रेडिट रेटींग करून घेतले जात आहे. तथापि, एक किंवा एकापेक्षा अधिक संस्थांकडून क्रेडिट रेटींग करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार, केअर रेटींग लिमिटेड या संस्थेचा अर्ज महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे महापालिकेचे पतमापन करण्यासाठी प्रथम वर्षाकरिता दोन लाख रूपये अधिक जीएसटी असा २ लाख ३६ हजार रूपये आणि प्रतिवर्षी सर्व्हिलियन्स शुल्क असा दर राहणार आहे. २०१८-१९ पासून पुढील सहा वर्षाकरिता हे दर लागू राहणार आहेत.