सांडपाण्याचा फेरवापरासाठी ६५४ कोटी रूपयांच्या प्रकल्पाला मान्यता

चिखलीतील मलशुद्धीकरण केंद्राचे आयुष्यमान संपुष्टात येत असल्याने या मैलाशुद्धीकरण केंद्राची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. या ठिकाणी २० एमएलडी क्षमतेच्या एमबीआर तंत्रज्ञानावर मैलाशुद्धीकरण केंद्र करण्याचे प्रस्तावित आहे.

    पिंपरी: पिंपरी चिंचवड़ शहरातील विविध मलनि:सारण केंद्रामधून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त पाण्यावर पुढील प्रक्रियाकरून औद्योगिक तसेच निवासी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाच्या या प्रकल्पासाठी अंदाजे ६५४ कोटी रूपये इतका खर्च होणार आहे. हा प्रकल्प एचएएम पद्धतीने राबविण्याचे प्रस्तावित आहे. एकूण खर्चापैकी महापालिकेमार्फत ४० टक्के भांडवली खर्च ठेकेदारास वितरीत करण्यात येईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास महापालिका सभेने प्रशासकीय मान्यता दिली. या विषयावर तब्बल तीन तास चर्चा झाली.

    शहरातील सांडपाण्यावर शहरातील विविध मलनि:सारण केंद्राद्वारे प्रक्रीया केली जाते. या मलनि:सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त पाण्यावर पुढील प्रक्रिया करून शहरातील औद्योगिक तसेच निवासी भागात पाणी पुरवठा करण्यासाठी सल्लागारामार्फत शहरासाठी विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाच्या विस्तृत धोरणास तसेच या प्रकल्पाची अंमलबजावणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) किंवा हायब्रीड अ‍ॅन्युइटी मॉडेल (एचएएम) मोडनुसार करण्याचा प्रस्ताव महापालिका सभेसमोर ठेवण्यात आला होता. या मास्टर प्लॅनमध्ये शहराच्या भौगोलिक रचनेनुसार चार भाग करण्यात आले आहेत. त्यामध्ये पहिल्या भागात पिंपळे-सौदागर, वाकड, हिंजवडी एमआयडीसी आणि चिंचवड, दुसNया भागात चिखली एमआयडीसी, तिसऱ्या भागात निगडी प्राधिकरण आणि तळेगाव एमआयडीसी आणि चौथ्या भागात चाकण एमआयडीसी या परिसरांचा समावेश आहे.

    या आराखड्यानुसार, संपूर्ण शहरासाठी प्रतिदिन १२० दशलक्ष लिटर एवढ्या प्रक्रीयायुक्त पाण्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. या मास्टर प्लॅनपैकी पहिल्या टप्प्यात स्मार्टसिटी अंतर्गत एरिया बेस डेव्हलपमेंट (एबीडी) मधील पिंपळे-सौदागर, वाकड, हिंजवडी एमआयडीसी परिसरासाठी कासारवाडी मलनि:सारण प्रक्रीया केंद्रातून प्रतिदिन ७५ दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रियाकरून पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे. तथापि, शहरासाठी विस्तृत आराखड्यामधून महापालिका हद्दीबाहेरील हिंजवडी भागासाठी एमआयडीसीकडून अद्याप सांमजस्य करार (एमओयू) झाला नसल्याने सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यामधून वगळण्याचे तसेच शहरातील पाण्याची टंचाई असणाऱ्या भागाचा समावेश करून प्राधान्यक्रम बदल करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. त्यानुसार, शहरातील वेगाने वाढणाऱ्या चिखली आणि चऱ्होली या दुसऱ्या टप्प्यातील भागाचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सीमा सावळे, मंगला कदम, आशा शेंडगे, अनुराधा गोफणे, सुजाता पालांडे, भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, संदिप वाघेरे, राहुल कलाटे, योगेश बहल, पंकज भालेकर, सचिन भोसले, विकास डोळस शत्रुघ्न काटे यांनी भाग घेतला.

    चिखलीतील मलशुद्धीकरण केंद्राचे आयुष्यमान संपुष्टात येत असल्याने या मैलाशुद्धीकरण केंद्राची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. या ठिकाणी २० एमएलडी क्षमतेच्या एमबीआर तंत्रज्ञानावर मैलाशुद्धीकरण केंद्र करण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भात संभावित इच्छूक ठेकेदारांची ११ जून २०२० रोजी ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा प्रकल्प ‘एचएएम’ पद्धतीत कमीत कमी ६० टक्के प्रकल्प किमतीची रक्कम उभी करू शकतात तसेच विविध वित्तीय संस्था आणि वित्तीय पुरवठा करणाऱ्या धनको यांनी प्रकल्प उभारणीच्या काळात कर्जावरील लागणारे व्याज हे प्रकल्प किंमतीत
    गृहित धरावे, अशी मागणी केली. त्याबाबत प्रकल्पाच्या टेक्निकल अ‍ॅप्रॅसियल समितीकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी मान्यता दिली आहे. पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी)किंवा हायब्रीड अ‍ॅन्युइटी मॉडेल (एचएएम) मोडनुसार सांडपाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण प्रक्रिया केंद्र आणि यंत्रणा उभारणी तसेच विविध वित्तीय पुरवठादाराद्वारे निधी उभारण्यासाठी महापालिका आयुक्तांना प्राधिकृत करण्यास मान्यता देण्याचे प्रस्तावित आहे