‘एप्रिल’ पिंपरी – चिंचवडकरांसाठी ठरला जीवघेणा ; या महिन्यात कोरोनामुळे १४८८ जणांचे थांबले श्वास

शहरासह उपनगरांमध्ये कोरोनाने नाकीनऊ आणले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन हादरले असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. साध्या खाटा नाहीत, ऑक्सिजन बेड नाही, आयसीयु बेड नाही की रेमडेसिव्हिर इंजेक्शन नाही अशी प्रतिकूल परिस्थिती आहे.

  पिंपरी: एप्रिल महिना पिंपरी – चिंचवडकरांसाठी जीवघेणा ठरला आहे. संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचे प्रमुख केंद्र ठरलेल्या पिंपरी – चिंचवडमध्ये कोरोनाने एप्रिलमध्ये मोठी उसळी घेतली. अवघ्या तीस दिवसात शहरातील ७० हजार २८५ जणांना तर महापालिका हद्दीबाहेरील १ हजार ७९५ जणांना कोरोनाची बाधा झाली. दुर्देवाची बाब म्हणजे तब्बल १ हजार ४८८ कोरोनाबाधितांचे श्वास कायमचे थांबले.

  मागील वर्षी १० मार्च २०२० रोजी पुणे जिल्ह्यातील पहिला रुग्ण पिंपरी – चिंचवडमध्ये आढळला. चोर पावलांनी प्रवेश केलेल्या कोरोनाने आता राक्षसाचे रूप धारण केले आहे. सुरवातीला बोटावर मोजण्याएवढी संख्या आता दररोज दोन ते तीन हजारांपर्यंत जाऊन पोहोचली असून, मुत्यूची आकडेवारीही धडकी भरवित आहे. शहरासह उपनगरांमध्ये कोरोनाने नाकीनऊ आणले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन हादरले असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. साध्या खाटा नाहीत, ऑक्सिजन बेड नाही, आयसीयु बेड नाही की रेमडेसिव्हिर इंजेक्शन नाही अशी प्रतिकूल परिस्थिती आहे.

  फेब्रुवारी २०२१ पासून शहरातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. आजपर्यंत शहरातील कोरोना रुग्णसंख्या २ लाख १२ हजार ४६० वर जाऊन पोहोचली आहे. एप्रिलमध्ये पिंपरी – चिंचवडमध्ये ७० हजार २८५ हजार तर महापालिका हद्दीबाहेरील १ हजार ७९२ कोरोना रुग्ण आढळले. रुग्णवाढीचा हा आलेख अधिकच उंचावणारा आहे. पिपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग पुरुषांना झाला आहे. ६० टक्के पुरुष तर ४० टक्के महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे आकडेवारी सांगते. पुरुषांमध्ये २२ ते ३९ वयोगटातील तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

  महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह नवीन जिजामाता, नवीन भोसरी रुग्णालय, ऑटो क्लस्टर रुग्णालय जंबो कोवीड हॉस्पिटल येथे रुग्णावंर मोफत उपचार सुरु आहेत. याखेरिज, दहा ठिकाणी कोवीड केअर सेंटरही कार्यरत आहेत. शहरातील १३५ खाजगी रुग्णालयांत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ९ हजार खाटा रुग्णांसाठी आरक्षित आहेत.एप्रिल महिन्यात महापालिका रुग्णालयांसह सर्व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल होती. कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना बेडसाठी धावाधाव करावी लागली. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली. गावखेड्यातूनही अनेक रुग्ण उपचारासाठी शहराकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटर फुल झाली. पहिली लाट ओसरल्यानंतर महापालिका प्रशासन गाफिल राहिले. कोणत्याही उपाययोजना झाल्या नाही. दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. दुसऱ्या लाटेशी तोंड देताना आरोग्य यंत्रणेच्या नाकीनऊ आले आहे. आरोग्य कर्मचारी झोकून देऊन नागरिकांचा कोरोनापासून बचावासाठी लढत असले तरी ते प्रयत्न अपुरे पडत आहेत.

  एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या आणि मृत्यूंची संख्या वाढली. एप्रिलच्या तीस दिवसांत पिंपरी – चिंचवड मधील ९१३ तर शहराबाहेरील ५७५ रुग्णांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. यात एकाच कुटुंबातील दोन – तीन व्यक्तिंचाही समावेश आहे. अधिक संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णांची प्रकृती अचानक खालावून मुत्यू ओढावले. वाढती रुग्णसंख्या आणि मुत्यूदरामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. रुग्णालये फुल आहेत. त्यामुळे रुग्णांना घरीच उपचार घ्यावे लागत आहे. आजमितीला १३ हजार २०५ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. आतापर्यंत पिंपरी – चिंचवडमधील २ हजार ९७८ तर महापालिका हद्दीबाहेरील १ हजार ४८४ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. वाढता मृत्युदर चिंताजनक आहे. त्यातल्या त्यात ६५ हजार २५५ रुग्ण बरे झाले ही दिलासादायक बाब समजली जात आहे.

  १) आजपर्यंतची पॉजिटिव्ह रुग्णसंख्या : २,१२,४६०
  २) एप्रिलमधील पॉजिटिव्ह रुग्णसंख्या : ७०,२८५
  ३) आजपर्यंतची मृत्युसंख्या : ४,४६२
  ४) एप्रिलमधील मृत्युसंख्या : १ हजार ४८८
  ५) आजपर्यंतची कोरोना चाचणी : १०,८१,०८४
  ६) एप्रिलमधील कोरोना चाचणी :२,७७,३९६
  ७) आजर्यंतचे निगेटिव्ह रुग्ण : ८,६७,६५४
  ८) एप्रिलमधील निगेटिव्ह रुग्ण : २,०९,७१७
  ९) आजपर्यंतचे कोरोना मुक्त रुग्ण : १,८७,९३६
  १०) एप्रिलमधील कोरोना मुक्त रुग्ण : ६५,२५५